प्रिया राजवंश या अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललं गेलं नाहीये. प्रिया राजवंशचा मृत्यू मुंबईतल्या जुहू येथील तिच्या बंगल्यात झाला होता. या घटनेला २६ वर्षे उलटून गेली तरीही तिच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. चेतन आनंद यांच्यासह प्रिया राजवंश या बंगल्यात वास्तव्य करायची. तिच्या शरीरावर गळा दाबल्याच्या खुणा मिळाल्या होत्या. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र हे प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. हे प्रकरण काय? आपण जाणून घेऊ.

कोण होती प्रिया राजवंश?

प्रिया राजवंश ही एक अभिनेत्री होती. तिने ‘हीर रांझा’, ‘साहेब बहादुर’, ‘हिंदुस्थान की कसम’, ‘हंसते जख्म’, ‘कुदरत’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं होतं. हीर रांझा या चित्रपटात ती राज कुमार यांच्यासह झळकली होती. लोकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. मात्र ती खूप मोठं करिअर हिंदी चित्रपटसृष्टीत करु शकली नाही. प्रिया राजवंश आणि देवानंद यांचे बंधू चेतन आनंद या दोघांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ होते. चेतन आनंद हे देवानंद यांचे मोठे भाऊ होते. त्यांनी चित्रपट निर्मितीसह लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. चेतन यांचं लग्न झालं होतं तरीही त्यांचे प्रिया राजवंशशी प्रेमसंबंध होते. त्यांच्याबाबत अनेकदा चर्चा होत असत.

२६ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

चेतन आनंद यांचा मृत्यू १९९७ मध्ये झाला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २००० मध्ये प्रिया राजवंशचा मृतदेह हा त्यांच्या बंगल्यात आढळून आला. सुरुवातीला हे सांगण्यात आलं की प्रिया राजवंशने आत्महत्या केली. तसंच तिच्याबाबत अशाही चर्चा होत्या की ती दारुच्या आहारी गेली आहे. मात्र जेव्हा घटनेचा तपास झाला तेव्हा प्रियाच्या घरी गृहसेविका म्हणून काम करणाऱ्या मालाचं नाव समोर आलं. प्रियाच्या खुनात ती पण सहभागी होती अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र यापुढे काहीही घडलं नाही. नंतर अशाही चर्चा झाल्या की प्रिया राजवंशच्या हत्येमागे आर्थिक देवाण घेवाणीचं कारण होतं. तर काहींनी असंही सांगितलं की चेतन आनंद यांच्या कुटुंबाने गृहसेविका माला हीला ४ हजार रुपये दिले आणि प्रियाची हत्या करण्यास सांगितलं होतं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

Actress Priya Rajvansh
अभिनेत्री प्रिया राजवंशच्या मृत्यूचं गूढ कायम (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

२०११ मध्ये प्रियाच्या मृत्यूची फाईल पुन्हा ओपन झाली होती

२७ मार्च २००० हाच दिवस होता, प्रियाने तिच्या गृहसेविकेला सांगितलं की माझ्यासाठी एक ग्लास गरम दूध घेऊन ये. ते आणण्यासाठी माला गेली. पण ती परतली तेव्हा प्रियाचा जीव गेला होता असाही एक पैलू सांगितला जातो. तसंच सिने अभ्यासकांच्या मते प्रियाला डोक्यावर जखमा झाल्या होत्या. तसंच तिचा गळाही दाबण्यात आला होता. तिच्या बंगल्यात खुनी कसा शिरला आणि बाहेर कसा पडला ते समजू शकलं नाही असंही सांगितलं गेलं. पण तिच्या घरातच तिला ठार केलं गेलं हे वास्तव आहे. शिवाय त्याभोवती फिरणारे हे प्रश्न २६ वर्षांनीही कायम आहेत. प्रिया राजवंशच्या हत्येचं प्रकरण कुठल्याही उत्तरांशिवाय बंद झालं. हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं ते २०११ मध्ये कारण या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली. तरीही प्रिया राजवंशचा मृत्यू कसा झाला याबाबतचे अनुत्तरीत प्रश्न तिच्या हत्येला २६ वर्षे उलटून गेल्यानंतरही कायम आहेत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांचं गूढ उकललं गेलं नाही. प्रिया राजवंशच्या मृत्यूचं प्रकरणही तसंच आहे.