A.R. Rahman Assistant Apologizes Marathi Director : आपल्या संगीतामुळे चर्चेत राहणारे ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान गेले काही दिवस त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. अशातच ते त्यांच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहेत, हा सिनेमा म्हणजे ‘गांधी टॉक्स’. बेळेकर यांच्या ‘गांधी टॉक्स’ या सिनेमासाठी रहमान यांनी संगीत दिलं आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने किशोर आणि रहमान यांनी एकत्र काम केलं असून रहमान यांनी या चित्रपटाच्या संगीतासाठी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च केल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. तसंच रहमान यांच्या असिस्टंटने किशोर यांची माफी मागितल्याचा किस्साही शेअर केला आहे.
एबीपी माझावरील माझा कट्टा कार्यक्रमात किशोर म्हणाले, “ए. आर. रहमान यांच्याबरोबर काम करण्याचा माझा अनुभव वेगळा आहे. त्यांच्याकडे जाण्याआधी मी इकडच्या पाच-सहा संगीतकरांना भेटलो होतो. पण कुणीही ऐकून घेतलं नव्हतं. नंतर रहमान सरांना अप्रोच केलं. त्यांना मी मेल पाठवला. मग त्यांनी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मला झुम मिटींगसाठी बोलावलं. त्या मीटिंगमध्ये सिनेमाबाबत आमचं एक तास बोलणं झालं. त्यांनी मला सगळे प्रश्न विचारले. मग त्यांनी होकार दिला. यावर मी त्यांना म्हटलं की, ‘तुम्ही मला हो म्हणालात; पण माझ्याकडे पैसे नाहीत आणि निर्माताही नाहीय. तर मी तुमचं नाव वापरुन एखाद्या निर्मात्याकडे गेलो तर चालेल का?’ तेव्हा ते ‘हो’ म्हणाले. त्यांनी सांगितलं की, ‘तू बिनधास्त माझं नाव वापर. सांग रहमान तुमच्या चित्रपटाचं म्युझिक करतोय’.”
रहमान खूप पैसे घेतात असं बोललं जातं पण…
यापुढे किशोर म्हणाले, “ते खूप पैसे घेतात असं रहमान यांच्याबद्दल बोललं जातं. पण माझ्या चित्रपटासाठी त्यांनी पदरचे पैसे खर्च केले आहेत. त्यांनी बुढापेस्टमध्ये चित्रपटाचं सगळं लाईव्ह म्युझिक केलं आहे. त्यांनी तीनवेळा माझ्या चित्रपटासाठी म्युझिकच काम केलं आहे. त्यांनी माझ्या चित्रपटावर, माझ्यावर प्रेम केलं आहे. दोन वर्षे ते माझ्याबरोबर या चित्रपटासाठी काम करत होते. त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावून घेतलं होतं. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. एकदा त्यांचा एक असिस्टंट मला ११ वाजता बोलावून १ वाजता भेटला. याबद्दल त्या असिस्टंटने एक वर्षांनी फोन करून माझी माफी मागितली. कारण त्याला रहमान सरांनी त्याला झालेल्या उशिराबद्दल माफी मागायला सांगितली होती.”
रहमान यांना मी एक विनंती केली होती की…
शेवटी ते म्हणाले, “मी त्यांना एक विनंती केली होती की, चित्रपट मागे सुरू असताना त्यावर लाईव्ह म्युझिक करावं. यावर ते ‘यासाठी मला दोन महिने लागतील. पण तुझी इच्छा आहे ना… मग आपण करू’, असं म्हणाले. मग एका आठडव्यात त्यांनी माझी ती इच्छा पूर्ण केली. हे आहेत रहमान सर. त्यांना मी एक रोमॅंटिक गाणं हवं म्हणून सांगितलं. त्यांना माहीत नव्हतं मी ते गाणं कुठे टाकणार आहे. पण गाणं हवं, असं मी त्यांना म्हणालो आणि माझ्यासाठी त्यांनी रोमॅंटिक गाणं बनवलं. असे अनेक हट्ट त्यांनी माझे पूर्ण केले आहेत. हे आहेत ए. आर. रहमान सर…”

