A R Rahman’s Daughter Slams Troller : ए. आर. रहमान बॉलीवूडमधील लोकप्रिय संगीतकार आहेत. त्यांनी आजवर त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. पण, सध्या ए. आर. रहमान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. अशातच आता त्यांच्या लेकीने वडिलांना ट्रोल करणाऱ्यांबद्दल वक्तव्य केलं आहे.
ए. आर. रहमान यांच्यावर होत असलेल्या टीकेनंतर त्यांच्या दोन मुली खतिजा, रहिमा आणि मुलगा आमिन वडिलांना ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी एकत्र आले असून, यावेळी ए. आर. रहमान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतानाचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत. त्यामध्ये ए. आर. रहमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थित असल्याचंही पाहायला मिळत आहे.
भगवद्गीता, कुराण वाचायला वेळ नाही – ए.आर रहमान
ए. आर. रहमान यांची लेक रहिमा टीका करणाऱ्यांना उत्तर देत एक पोस्ट रीशेअर करीत म्हणाली, “त्यांच्याकडे भगवद्गीता वा कुराण किंवा बायबल वाचण्यासाठी वेळ नाहीये. ही ती पुस्तकं आहेत, जी प्रेम, शिस्त, शांतता आणि सत्य शिकवतात; पण त्यांच्याकडे भांडायला, वाद घालायला, अनादर करायला पुरेसा वेळ आहे. हा धर्म नाहीये. हा अंध समाज आहे. ज्याच्याकडे अपुरं शिक्षण, माहिती आहे, ज्यांना फक्त टोकाचं राजकारण करता येतं. हे अपुऱ्या पालकत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे एक अशी पिढी तयार झाली, जी मानवतेपेक्षा द्वेषाला जास्त प्राधान्य देते.”
ए. आर. रहमान काय म्हणालेले?
ए. आर. रहमान यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत, “गेल्या आठ वर्षांत सत्ताबदल झाला आणि आता जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांना निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आहे. हा बदल स्पष्टपणे दिसत नाही; पण अप्रत्यक्ष पद्धतीनं समजतो. कदाचित हे सांप्रदायिक कारणही असू शकते”, असं वक्तव्य केलं. त्यासह त्यांनी छावा या चित्रपटाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
मुलाखतीत ” ‘छावा’ हा फूट पाडणारा चित्रपट आहे; पण शौर्य हा त्याचा मूळ हेतू आहे. मी जेव्हा दिग्दर्शकाला विचारलं की, तुम्हाला या चित्रपटासाठी मीच का पाहिजे? तर ते म्हणाले की, आम्हाला फक्त तुम्हीच हवे आहात. हा चित्रपट पाहण्यासाठी छान आहे आणि लोक हुशार असतात. तुम्हाला वाटतं की, त्यांच्यावर चित्रपटांचा प्रभाव होणार आहे? काय खरं व काय खोटं याची समज त्यांना आहे आणि ते त्यातून तीच गोष्ट घेतात, जी त्यांना हवी असते. ही खूप चांगली गोष्ट आहे”, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
