A R Rahman Gives Clarification : आपल्या संगीतामुळे चर्चेत राहणारे ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान हे सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. या चर्चेचं कारण म्हणजे त्यांनी ‘छावा’ सिनेमाला फूट पाडणारा सिनेमा म्हटलं आहे. तसेच ए. आर. रहमान यांनी मुलाखतीत सांप्रदायिक घटकांमुळे त्यांना मिळणाऱ्या कामावर प्रभाव पडत असल्याचंही सांगितलं. ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेनंतर आता स्वत: रहमान यांनी व्हिडिओ शेअर करीत स्पष्टीकरण दिलंय.

ए. आर. रहमान यांच्या सांप्रदायिकतेच्या विधानावर गीतकार जावेद अख्तर, गायक शान, अभिनेत्री कंगना रणौतसह अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही कलाकारांनी त्यांना समर्थन दिलं; तर अनेक कलाकारांनी त्याच्या विधानाचा विरोध केला आहे. त्यावर आता रहमान यांनी स्वत:हून आपलं मत स्पष्ट केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? चला जाणून घेऊ…

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ए. आर. रहमान म्हणतात, “प्रिय मित्रांनो, संगीत नेहमीच माझ्यासाठी लोकांना जोडण्याचे, आनंद घेण्याचे व संस्कृतीचा सन्मान करण्याचे माध्यम राहिले आहे. भारत माझी प्रेरणा आहे, माझा गुरू आहे आणि माझे घरदेखील आहे. मला समजतंय की, कधी कधी विचारांबद्दल गैरसमज होऊ शकतो. मी कधीही कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला नाही आणि आशा करतो की, लोक माझ्या प्रामाणिक भावना समजून घेतील. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करता येते आणि देशातील विविध संस्कृतींचा उत्सव संगीतातून साजरा करण्याची मला संधी मिळते.”

Award Banner

रहमान पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर Jhaala सादर करणे, तरुण नागा संगीतकारांशी सहकार्य करणे, Sunshine Orchestra चे मार्गदर्शन करणे, भारताचा पहिला मल्टीकल्चरल व्हर्च्युअल बँड Secret Mountain तयार करणे आणि हान्स झिमर यांच्यासह ‘रामायण’साठी संगीत करणे – हा प्रत्येक प्रवास माझ्या उद्देशाला अधिक मजबूत बनवतो. मी या देशाचा ऋणी आहे. इतिहासाचा सन्मान करणारे आणि भविष्याला प्रेरणा देणारे संगीत बनवण्यास मी नेहमीच तत्पर आहे. जय हिंद! जय हो!”

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली, ती रहमान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. गेल्या काही वर्षांत त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत कमी काम मिळाले आहे. त्याचे कारण गेल्या आठ वर्षांत इंडस्ट्रीत सत्ताबदल आणि कदाचित सांप्रदायिक भेदभाव असू शकतो, असे नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं.

BBC Asian Network ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “गेल्या आठ वर्षांत सत्ताबदल झाला आणि आता जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांना निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आहे. हा बदल स्पष्टपणे दिसत नाही; पण अप्रत्यक्ष पद्धतीने समजतो. कदाचित हे सांप्रदायिक कारणही असू शकते.”