Aamir Khan on girlfriend Gauri Spratt: आमिर खान लवकरच’ हॅपी पटेल खतरनाक जासूस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात इमरान खान, वीर दास, मोना सिंग, मिथिला पालकर आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आमिर खान जितका त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल जाहीरपणे सांगितले होते. गौरी स्प्रॅट असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. तो व गौरी अनेकदा एकत्र दिसतात. या आधी आमिर खानने दोनवेळा लग्न केले आहे आणि दोन वेळा घटस्फोट घेतला आहे.

आमिर खान नेमकं काय म्हणाला?

अभिनेत्याने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याची पहिली पत्नी रीना दत्त, दुसरी पत्नी किरण राव यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्याचे नाते कसे आहे यावर वक्तव्य केले. तसेच, गर्लफ्रेंडबद्दल असलेल्या नात्याबद्दलही तो बोलला आहे.

तो म्हणाला, “रीना खूप चांगली व्यक्ती आहे. ती अशी व्यक्ती आहे, जिच्याबरोबर मी मोठा झालो आहे. मी तिच्याबरोबर १६ वर्षे घालवली आहेत, त्यामुळे आम्ही नवरा-बायको म्हणून वेगळे झालो तरी आम्ही माणूस म्हणून वेगळे झालो नाही. रीनाबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे, मी तिच्याबरोबर जो वेळ घालवला त्याबद्दल मला आदर आहे.”

पुढे तो म्हणाला, “खरेतर मी तिच्याबरोबर मोठा झालो आहे. आम्ही जेव्हा लग्न केले, तेव्हा आमच्या दोघांचेही वय लहान होते. मी उत्तम व्यक्ती आहे, त्यामुळे जेव्हा आमच्यात मतभेद झाले आणि आम्ही वेगळे झालो, तेव्हा आम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांपासून वेगळे झालो नाही. किरणबरोबरही माझे नाते तसेच आहे.” रीना दत्ता व आमिरला जुनैद खान व आइरा ही दोन मुले आहेत.

आमिरने १९८६ मध्ये रीना दत्ताबरोबर लग्न केले, परंतु २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर त्याने २००५ मध्ये किरण रावबरोबर लग्न केले. त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही, २०२१ मध्ये ते वेगळे झाले.

किरणबद्दल तो म्हणाला, “मला वाटतं किरण एक अद्भुत व्यक्ती आहे. तिने आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, पण आम्ही कुटुंब आहोत. मी असं म्हणत असताना गंमत करत नाहीये, आम्ही एक कुटुंब आहोत. किरण, तिचे पालक, माझे कुटुंब, रीना, तिचे पालक, आम्ही सर्व प्रत्यक्षात एक कुटुंब आहोत.” किरण व आमिर यांना आझाद हा मुलगा आहे.

आमिर खान असेही म्हणाला की, ६० व्या वर्षी तो पुन्हा प्रेमात पडेल असे त्याला वाटले नव्हते. तो म्हणाला, “मी असा विचार करत होतो, माझी जोडीदार होऊ शकेल अशी पार्टनर मला मिळणार नाही. मला पुन्हा जोडीदार मिळेल याची मी अपेक्षा करत नव्हतो. पण, गौरी माझ्या आयुष्यात आल्याने माझ्या आयुष्यात शांतता आली, स्थिरता आली, ती खूप चांगली व्यक्ती आहे. ती मला भेटली हे मी माझे नशीब समजतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आमचे लग्न टिकले नाही, पण तरीही मी रीना, किरण आणि गौरीला भेटलो, याचा मला आनंद आहे. या तीन व्यक्तींनी मला व्यक्ती म्हणून घडवले आहे, त्यांचे माझ्या आयुष्यात मोठे योगदान आहे”, असे म्हणत आमिर खानने कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, आमिरच्या कामाबद्दल बोलायचे तर तो सितारे जमीन पर चित्रपटात दिसला होता. तो लवकरच, मेरे रहो, हॅपी पटेल खतनाक जासूस आणि लाहोर १९८७ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.