आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ (२००१) या ब्लॉकबस्टर चित्रपटाने इतिहास रचला होता. या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या करिअरला नवी दिशा मिळाली. मात्र, अभिनेता सिनेमात ‘बाघा’ ही भूमिका करणाऱ्या अमीन हाजी यांच्याबाबत असं घडलं नाही. अमीन हाजी यांना वाटतं की आमिर खानच्या या चित्रपटाने त्यांचं करिअर बरबाद केलं. अर्थात, या चित्रपटाने त्यांचं वैयक्तिक काहीच नुकसान झालं नाही, पण नंतर त्याहून मोठा हिट चित्रपट त्यांना करता आला नाही.

चित्रपट रिलीज होऊन आता २५ वर्षे झाली आहेत, तरीही अमीन यांच्यामते ‘लगान’मधील मुक्या ‘बाघा’इतकी प्रभावी आणि ताकदीची भूमिका त्यांना पुन्हा कधीच मिळाली नाही. “लगानने माझं करिअर बरबाद केलं, हेच सत्य आहे,” असं अमीन म्हणाले.

‘बाघा’सारखी भूमिका पुन्हा का मिळाली नाही? अमीन हाजी म्हणाले…

अभिनेता अमीन हाजी यांनी या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी जगजीत सिंग यांच्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या गझलच्या ओळी वापरल्या. ते म्हणाले, “हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले… बहोत निकले मेरे अरमां, लेकिन फिर भी कम निकले.”

लगाननंतर अभिनयाची इच्छाच उरली नाही

‘लगान’नंतरही अमीन यांना अनेक सिनेमाच्या ऑफर्स आल्या, पण त्यापैकी एकही भूमिका किंवा चित्रपट आमिर खानच्या ‘लगान’च्या जवळपास जाणारी नव्हती. अमीन म्हणाले, “‘लगान’ संपल्यावर मला अभिनय करण्याची इच्छाच उरली नव्हती. मला ऑफर्स येत होत्या, पण चित्रपटाची स्क्रिप्ट किंवा माझी भूमिका ‘लगान’सारखी प्रभावी वाटत नव्हती. एका टप्प्यावर आशुतोष गोवारीकर आणि माझी पत्नी शार्लटने मला विचारलं, ‘तू आता पुढे काय करणार?’ त्यावर मी म्हणालो, ‘तुम्हीच मला सांगा,’ कारण मला त्या सुमार ऑफर्स स्वीकारायच्या नव्हत्या.”

अमीन पुढे म्हणाले, “मुळात, मला ‘लगान’मुळे जो आदर-सन्मान मिळाला होता, तो मला खराब करायचा नव्हता. तसेच मी काही खूप मोठा किंवा उत्तम अभिनेता नाही. ‘लगान’ची उत्तम स्क्रिप्ट, दिग्दर्शक आणि तिथली टीम यामुळेच मी चांगलं काम करू शकलो. त्या सर्वांनी मला खूप मदत केली.” अमीन यांना भीती वाटत होती की इतर चित्रपटांच्या सेटवर लोकांना समजेल की ते काही फार मोठे अभिनेते नाहीत.

आशुतोष गोवारीकरांनी दिली चित्रपट लिहायची ऑफर

अमीन यांची ही मनःस्थिती पाहून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी अमीन यांना चित्रपट लिहिण्याबद्दल विचारलं. तो चित्रपट म्हणजे शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘स्वदेश’ (२००४) होता. “तू माझ्याबरोबर ‘देश’ चित्रपट लिहिणार का?” असं आशुतोष यांनी विचारलं होतं. “त्या वेळी या चित्रपटाचं नाव ‘देश’ होतं. मी आशुतोषला विचारलं, ‘आशू, जगातील कोणत्याही लेखकाला तुझ्याबरोबर काम करावं वाटेल आणि तू मला विचारतोय?’ त्यावर तो म्हणाला, ‘तू नवीन कल्पनांवर चर्चा करण्यासाठी उत्तम व्यक्ती आहेस. तू प्रामाणिक आहेस आणि मी तुला याआधीही अनेक स्क्रिप्ट्स ऐकवल्या आहेत. तू माझ्याबरोबर ‘लगान’मध्ये काम केलंय, त्यामुळे मला वाटतं की तू हे काम खूप छान करशील. तू माझ्याबरोबर ‘स्वदेश’चा लेखक होशील का?’ माझा तर यावर विश्वासच बसत नव्हता.”

संसार टिकवायला काम करावं लागेल

अमीन पुढे म्हणाले, “आशू मला म्हणाला, ‘तू काहीच करत नाहीस आणि घरी बसून आहेस यामुळे शार्लट (अमीन यांची पत्नी) नाराज आहे. जर तुला संसार करायचा असेल, तर तुला पैसे कमवावे लागतील.’ तेव्हा ‘आमिर खान प्रोडक्शन्स’ने ‘देश’ची निर्मिती केली होती. “त्यानंतर मी फार अभिनय केला नाही, मोजकेच चित्रपट केले. पण ‘लगान’ आणि आशुतोष गोवारीकर यांच्यामुळे मी लेखक झालो. त्यानंतर मी ‘कोई जाने ना’ (२०२१) या माझ्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाने मला सिनेमा काय असतो हे शिकवलं,” असं अमीन हाजी यांनी म्हटलं.