Aamir Khan Confirms 3 Idiots Sequel : अलीकडे काही गाजलेल्या बॉलीवूड चित्रपटांचे सिक्वेल येत आहेत. अशा अनेक चित्रपटांची चर्चा सुरू आहे. अशीच काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलबाबत चर्चा सुरू झाली होती. अशातच ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलवर स्वत: आमिर खाननेच प्रतिक्रिया दिली आहे.

२००९ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘3 इडियट्स’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याबद्दल एका मुलाखतीदरम्यान स्वतः आमिर खानने अधिकृत माहिती दिली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे काम सध्या सुरू असल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच त्याने कथा काय असणार आणि कलाकारांबद्दलही सांगितले.

आमिर खानकडून ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आमिर म्हणाला, “सध्या ‘३ इडियट्स’च्या सिक्वेलवर काम सुरू आहे. मी या कथा ऐकली असून ती खूपच छान आहे. संहितेवर अजून थोडे काम बाकी आहे, पण मूळ कथा अतिशय उत्तम आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यातही विनोद आणि एक आगळीवेगळी कथा पाहायला मिळेल. ही ‘3 इडियट्स’चीच गोष्ट असेल, पण ती १० वर्षांनंतरच्या काळावर आधारित असेल.”

यापुढे आमिर म्हणाला, “हा असा एक चित्रपट आहे; ज्यावर मी लवकरच काम सुरू करणार आहे. अभिजात जोशी आणि राजू हिराणी यांनी ही कथा खूप सुंदर लिहिली आहे. त्यामुळे मीदेखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”

कलाकार कोण असणार आणि चित्रीकरण कधी सुरू होणार?

चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होईल याची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच हं चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याबद्दलची माहितीही समोर आलेली नाही. पण आमिरच्या आगामी चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट अग्रस्थानी असेल. मिळालेल्या माहितीनुसार, या सिक्वेलमध्ये आमिर खानसह आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर ही मूळ कलाकार मंडळी पुन्हा एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

3 idiots poster
आमिर खानच्या ‘3 इडियट्स’चे पोस्टर (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)

‘3 इडियट्स’च्या सिक्वेलवर शर्मन जोशीची काय म्हणालेला?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शर्मन जोशीने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल आपली इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, “अनेक वेळा ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची चर्चा झाली, पण मागच्याच्या वेळी ती चर्चा फक्त एका जाहिरातीसाठी झाली होती. आशा आहे की यावेळी ही बातमी खरी ठरेल.”

दरम्यान, २००९ मधील ‘3 इडियट्स’ या चित्रपटातून शिक्षण व्यवस्थेबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडण्यात आला होता. हा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचा चित्रपट आहे. अशातच आता याचा सिक्वेल येणार आहे, ज्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.