Aamir Khan Third Marriage with Gauri Sprat: बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या भूमिकांसाठी, त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो ज्या पद्धतीने काम करतो, त्याचे सहकलाकार वेळोवेळी कौतुक करतात. या सगळ्याबरोबरच आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत असतो. आमिर खानने गेल्यावर्षी ६० व्या वाढदिवसाला त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख सर्वांना करून दिली होती. गौरी स्प्रॅट असे आमिरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे.

गौरी मुळची बेंगळुरूची आहे. जेव्हा अभिनेत्याने तिची ओळख सर्वांना करून दिली, त्याआधी दीड वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर गौरीचे अनेक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच, ती आमिर बरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसली आहे

गेल्या काही दिवसांपासून आमिर व गौरी लग्न करणार आहेत, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसले. ५ जुलैला ते लग्नबंधनात अडकणार असल्याच्या या चर्चांना उधाण आले आहे. आता आमिर खानने यावर वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

“माझे लग्न…”

अभिनेत्याने नुकतीच व्हरायटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, “मी सध्या अमेरिकेत प्रवास करत आहे. माझ्या लग्नाची जी चर्चा सुरू आहे, ती खरी आहे. माझे लग्न ५ जुलैला आहे.”

काही दिवसांपूर्वी आमिरने लग्नाचा विचार करत नसून सध्या आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आनंदी आहोत, समाधानी आहोत असे म्हटले होते. त्यानंतर काहीच काळात अभिनेत्याने लग्नाची घोषणा केली आहे. तो म्हणाला, “लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये समाधानी असल्याचे म्हणालो होतो आणि ते खरं आहे, पण आम्हा दोघांनाही वाटतं की आम्ही आमचं नातं पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तयार आहोत. मी समाधानी आहे. मी आणि गौरी एकमेकांबद्दल गंभीर आहोत आणि आम्ही एकमेकांना वचनबद्ध आहोत. आम्ही जोडीदार आहोत, एकत्र आहोत. माझ्या मनात तर मी तिच्याशी आधीच लग्न केले आहे, त्यामुळे आमच्या एकत्र असण्याला अधिकृत स्वरूप देणे, आमच्या सहजीवनाचे एक पुढचे पाऊल वाटते.”

गौरी स्प्रॅटबद्दल बोलायचे तर ती वेलनेस आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करते. आमिर खानचे हे तिसरे लग्न असणार आहे. १९८६ ला आमिर खानने रीना दत्ताशी पहिले लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आमिऱ खानने लोकप्रिय चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका किरण रावशी दुसरे लग्न केले. २००५ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगा आहे. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता.