Aamir Khan on Dhurandhar 2 Ranveer Singh Movie: रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर २’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. पहिला वीकेंड गाजवणाऱ्या या चित्रपटाच्या दुसऱ्या वीकेंडच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, या सगळ्यात आमिर खानची प्रतिक्रिया आली नाही, कारण त्याने अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही.
धुरंधरबद्दल आमिर खान म्हणाला…
रणवीर सिंहच्या या चित्रपटाबद्दल एका कार्यक्रमात आमिर खानने विधान केलं. “मला वाटतं हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करत आहे. मी अजून तो पाहिलेला नाहीये, पण मी त्याचं कौतुकच ऐकत आहे. ‘धुरंधर १’ आणि आता ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांनी उत्तम कामगिरी केली आहे, धुरंधरच्या टीमला खूप शुभेच्छा,” असं आमिर खान म्हणाला.
धुरंधर रिलीज झाल्यावर बऱ्याच बॉलीवूड कलाकारांनी पोस्ट केल्या होत्या. त्यातल्या अनेकांनी धुरंधर २ बद्दल बोलणं टाळलंय. यात हृतिक रोशनचाही समावेश आहे. या चित्रपटातील विचार पटले नसले, तरी त्यातील भव्यता आणि मांडणीचे कौतुक आहे, असं हृतिक रोशनने म्हटलं होतं.
इमरान खानचे परखड मत चर्चेत
धुरंधर २ मधील रक्तपात, हिंसा याबद्दल चर्चा होत आहे. या वादात आमिर खानचा भाचा, अभिनेता इमरान खान याने ‘हिंसक हिरो’ दाखवण्याच्या वाढत्या ट्रेंडवर उघडपणे भाष्य केलं आहे. एका रेडिट सेशनमध्ये इमरान म्हणाला, “रक्ताने माखलेला आणि रागीट माणूस साकारण्यात मला रस नाही. मला वाटतं सध्या असाच प्रकार खूप जास्त प्रमाणात दाखवला जात आहे.”
अशा चित्रपटांमधून वाढत्या हिंसेचे उदात्तीकरण केले जात आहे, याबद्दल इमरानने काळजी व्यक्त केली. “नकार पचवू न शकणाऱ्या आणि भावनिकदृष्ट्या अपरिपक्व पुरुषांच्या हिंसक वागण्याला ज्या प्रकारे या चित्रपटांतून खतपाणी घातलं जातंय, ते पाहून मी अस्वस्थ होतो.” हिंसा दाखवणं आणि तिचं समर्थन करणं यात फरक आहे, असं स्पष्ट मत इमरान खानने मांडलं. “हिंसा पडद्यावर दाखवणं आणि तिला योग्य ठरवणं यात मोठा फरक आहे. लोक विचार न करता केवळ ट्रेंडच्या मागे धावत आहेत असं मला वाटते. माझी सदसद्विवेकबुद्धी मला अशा बेजबाबदार कथेचा भाग होण्याची परवानगी देत नाही,” असं इमरान खान स्पष्टच बोलला.
धुरंधर २ बद्दल नकारात्मक व सकारात्मक दोन्ही प्रकारच्या चर्चा होत आहेत. या चर्चांदरम्यान आदित्य धर दिग्दर्शित चित्रपटाने एका आठवड्यात भारतात ७७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
