आमिर खानची एक्स पत्नी आणि दिग्दर्शिका किरण रावने इम्रान खानला पाठिंबा दिला आहे. इम्रानच्या भारतातील वास्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिने ही भूमिका घेतली आहे. मुंबईतील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिली आहे. इम्रान अमेरिकेचे नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर तो चर्चेत आला.

किरण रावचा इम्रान खानला पाठिंबा

१५ ऑक्टोबर रोजी किरण रावने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून इम्रान खानला पाठिंबा दिला. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रानला भारत सोडण्याची नोटीस मिळाल्याबद्दलच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना तिने, “वा! आता मुंबई पोलीस?” असं लिहिलं. याशिवाय, तिने एका इन्फ्लुएन्सरची पोस्टही शेअर केली. त्यामध्ये लिहिलं होतं, “वय ४३ वर्षे. त्यापैकी ४० वर्षे भारतात घालवली. इथेच शिक्षण घेतलं, काम केलं, यश मिळवलं, अपयशाचा सामना केला, प्रेम केलं आणि आपल्या हक्कांसाठी लढा दिला.”

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनापासून झाली. या आंदोलनात अभिनेता आमिर खानचा भाचा इम्रान खान त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसह सहभागी झाला होता. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)ने या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी इम्रान आणि लेखा यांच्यासह काही जणांना ताब्यात घेतलं होतं.

Imran Khan Actor FRRO Notice details | Kiran Rao Supports Imran Khan over leave India notice
किरण रावचा इम्रान खानला पाठिंबा

आंदोलनाबद्दल इम्रान काय म्हणालेला

या आंदोलनादरम्यान इम्रानने प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. तो म्हणाला, “माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. मी इथे एक नागरिक म्हणून, या शहरात राहणारी व्यक्ती म्हणून आलो आहे. लोकांच्या हालचालींच्या स्वातंत्र्यावर बंधनं का घातली जात आहेत आणि त्यांचा आवाज का दाबला जात आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो आहे.”

दरम्यान, इम्रान खान मुंबईतील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) दिलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याच्या निर्देशाला आव्हान देणारी याचिका त्याची कायदेशीर टीम शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत दाखल करण्याची शक्यता आहे. या निर्देशाला त्याने अतिशय कठोर असं म्हटलं आहे. तसेच, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारकांना आंदोलनात सहभागी होण्यास कायद्याने स्पष्टपणे मनाई केलेली नाही, असा युक्तिवादही त्याच्या वकिलांनी केल्याचं वृत्त आहे.