Aamir Khan-Gauri Spratt First Photo Of Wedding: आमिर खान काही दिवसांपासून त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचा खुलासा केला होता. आज (रविवार, ५ जुलै) आमिर खान व गौरी स्प्रॅट यांचे लग्न झाले आहे. आमिर खानच्या लग्नातील काही व्हिडीओ, काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर खानच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितित हा सोहळा पार पडला. आमिर व गौरीने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. अभिनेत्याच्या लग्नाला राज ठाकरेंसह अंबानी कुटुंब, इरफान पठाण आणि इंडस्ट्रीतील इतर मंडळी हजर होती. लग्नासोहळ्यादरम्यान आमिर खान भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

आमिर खानच्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर

आमिरची मुलगी आइरा खान तिच्या पतीसह या सोहळ्याला हजर होती. आमिरचा मोठा मुलगा जुनैदही त्याच्या लग्नाला हजर होता. तसेच, आमिर व किरण राव यांचा मुलगा आझाददेखील या सोहळ्याला उपस्थित होता.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आमिर व गौरीने १२.४५ वाजता कागदपत्रांवर सह्या केल्या. यावेळी त्यांच्याबरोबर गौरीचा मुलगादेखील हजर होता. लग्नानंतर गौरी व आमिर दोघेही भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. लग्नानंतर आमिरने पापाराझींना मिठाई वाटली. आमिर व गौरीच्या लग्नात १०० ते१५० पाहुणे हजर होते.

लोकप्रिय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी पत्नीसह आमिरच्या लग्नाला हजेरी लावली. त्यांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. वीर दासनेही त्याच्या पत्नीसह आमिर खानच्या लग्नात हजेरी लावली. इरफान पठाणदेखील या सोहळ्याला हजर राहिला. त्याबरोबरच अभिनेत्री एली अवरामसुद्धा या सोहळ्याला हजर होती. तिने सुंदर साडी नेसली होती.

समोर आलेल्या व्हिडीओमधून आमिर व गौरीचा लग्नसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडल्याचे दिसत आहे. आमिरचे हे तिसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न रीना दत्ताबरोबर १९८६ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. त्याचे दुसरे लग्न लोकप्रिय चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका किरण रावबरोबर झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. आता गौरीबरोबरचे त्याचे हे तिसरे लग्न आहे.