Aamir Khan Emotional On Flop Movie : बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आजही त्याच्या २०२२ मध्ये आलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या अपयशातून पूर्णपणे सावरलेला नाही. या चित्रपटाच्या अपयशाबद्दल त्यानं याआधी विविध मुलाखतींतून आपलं मत मांडलं आहे.

अशातच आता पुन्हा एकदा त्यानं याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये आमिरनं सांगितलं की, ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाचा धक्का त्याच्या आधीच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या अपयशापेक्षा खूप वेगळा होता.

आमिर म्हणाला, ” ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चालला नाही तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही. कारण- मला स्वतःलाच तो चित्रपट आवडला नव्हता. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या वेळी एखादा संथ गतीने होणारा एखादा अपघात मी डोळ्यांनी पाहत होतो, असं वाटत होतं. पण ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट मला खूप आवडला होता आणि आजही तो एक चांगला चित्रपट आहे, असं मला वाटतं.”

“काही लोकांना ‘लाल सिंग चड्ढा’ आवडला; पण अनेकांना तो समजला नाही. प्रेक्षकांना न आवडणारा चित्रपट कधीच अयशस्वी होत नाही. प्रेक्षकांना तो चित्रपट आवडला नाही, हे मी मान्य करतो. जर प्रेक्षक चित्रपटाशी जोडले गेले नाहीत, तर तो चालत नाही”, असं तो म्हणाला.

आमिरनं सांगितलं की, ‘लाल सिंग चड्ढा’बद्दल त्याला थोडा जास्तच आत्मविश्वास होता. “माझे सलग बरेच चित्रपट हिट झाले होते. त्यामुळे माझ्यात अतिआत्मविश्वास आला होता. मला वाटलं की, हा चित्रपटही सहजपणे ३०० कोटींची कमाई करील. पण, खरं तर मी माझ्या टीमबरोबर बसून, हा ‘मेनस्ट्रीम’ चित्रपट नाही, हे समजून घ्यायला हवं होतं. त्यानुसार बजेट आणि अपेक्षा ठरवायला हव्या होत्या,” असं आमिर म्हणाला.

‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यावर आमिर खूप खचला होता. चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना आमिर भावूक झाला आणि त्याचे डोळे पाणावले. तो म्हणाला, “मला खूप दुःख झालं होतं आणि मी खूपच हताश झालो होतो. जणू काही मी माझं एखादं मूल गमावलं आहे, असं वाटलं. मी पूर्णपणे कोलमडलो होतो. नंतरचे काही महिने माझ्यासाठी खूप कठीण गेले; पण मग मी स्वतःला त्यातून बाहेर काढलं”, असं तो म्हणाला.

चित्रपट फ्लॉप झाला असला तरी त्या कठीण काळात आमिरला त्याच्या कुटुंबाची मोठी साथ मिळाली. “माझ्या बहिणी, आई आणि मुलं (जुनैद, इरा, आझाद) माझ्याबरोबर होते. माझी एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता यांनीही माझी विचारपूस केली. मला आयुष्यात इतकं प्रेम कधीच मिळालं नव्हतं. कुटुंबाचं इतकं प्रेम मिळणार असेल, तर मी आणखी दोन-तीन फ्लॉप चित्रपट झाले तरी हरकत नाही”, असेही तो हसत म्हणाला.

दरम्यान, ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली होती. त्यात करीना कपूर, मोना सिंह, मानव विज, नागा चैतन्य यांच्यासह अनेक कलाकार होते. हा चित्रपट २०० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता; पण जगभरात फक्त १३० कोटींची कमाई करू शकला. मात्र, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे खूप कौतुक झाले.