अभिनेता आमिर खानने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्याशी ६ जुलै रोजी मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आमिरने साध्या सोहळ्यात तिसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र, कुटुंबीय आणि त्यांची मुलं उपस्थित होती. या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातील आमिर व गौरीचे लूक चर्चेत आहेत, पण त्याचबरोबर गौरीच्या लग्नाच्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आमिरने गौरीला दिली खास अंगठी
आमिर व गौरीच्या लग्नातील मुख्य आकर्षण म्हणजे आमिरने गौरीला भेट दिलेली अत्यंत सुंदर अंगठी होय. ‘क्वीन’ (Qween) ब्रँडने डिझाईन केलेल्या या अंगठीच्या मध्यभागी मादागास्करवरून आणलेला अत्यंत दुर्मिळ ‘कॅबोचॉन-कट’ (cabochon-cut) असलेला नैसर्गिक रुबी बसवण्यात आला आहे. हा मौल्यवान खडा सोन्याच्या कोरोनेटसारख्या स्ट्रक्चरवर लावण्यात आला आहे आणि त्याभोवती ४० खरे हिरे लावण्यात आले आहेत.
१३१ कारागिरांनी तयार केली अंगठी
रिपोर्ट्सनुसार, या रुबीचा शोध घेण्यासाठी तब्बल ३ महिने लागले, कारण जगात उपलब्ध असलेल्या एकूण रुबींपैकी फक्त ०.१ टक्क्यांपेक्षा कमी रुबी इतक्या उच्च दर्जाचे असतात. ही अंगठी तयार करण्यासाठी २५६ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. तब्बल १३१ कुशल कारागिरांनी ही अंगठी तयार केली आहे.

यापूर्वीही आमिरने भेट दिलेली दुर्मिळ अंगठी
विशेष म्हणजे, आमिरने आपल्या पत्नीसाठी अशी खास डिझाईन केलेला दागिना बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला गौरीने घातलेल्या एका अंगठीने लक्ष वेधून घेतलं होतं. ही अंगठी तिला आमिरने भेट दिली होती. या अंगठीत ब्राझीलवरून आणलेला एक दुर्मिळ ‘अक्वामरीन’ (aquamarine) खडा आणि ४० अस्सल हिरे होते.
आमिर खान व गौरी स्प्रॅटने घरीच साध्या सोहळ्यात लग्न केलं. या लग्नात आमिरची तिन्ही मुलं, त्याचबरोबर त्याचा जावई नुपूर शिखरेदेखील होता. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, राजकुमार हिरानी, विशाल भारद्वाज यांच्यासह इंडस्ट्रीतील काही लोकांनी आमिर व गौरीच्या लग्नाला हजेरी लावली होती. गौरी व आमिरच्या लग्नात त्यांच्या मुलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आमिरचा मुलगा आझाद राव खान आणि गौरीचा मुलगा ‘रिंग बेअरर’ होते. म्हणजेच या दोघांनी त्यांना एकमेकांना घालण्यासाठी अंगठ्या उपस्थितांसमोर आणल्या होत्या.
गौरी स्प्रॅटचा लग्नातील लूक
गौरी स्प्रॅटचा लग्नातील लूक प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केला होता. लग्नासाठी पारंपारिक लाल रंग न निवडता गौरीने पांढऱ्या रंगाची नाजूक फुलांची नक्षी असलेला रंगाचा लेहंगा निवडला होता. त्याचबरोबर तिने एक पारदर्शक ओढणी घेतली होती आणि सुंदर असे दागिने घातले होते. गौरीने साधा मेकअप केला होता आणि सैलसर ‘बोहेमियन फिशटेल वेणी’ घातली होती, त्या वेणीत नाजूक पांढरी फुलं माळली होती.
