अभिनेते-लेखक-दिग्दर्शक अमीन हाजी हे ‘लगान’च्या काळापासून आमिर खानला गेल्या अनेक दशकांपासून ओळखतात. त्यांनी नुकतंच आमिरच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू सांगितली. आमिर माणसांमधील चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांच्यावर अन्याय होतो, अशा व्यक्तींच्या बाजूने उभा राहतो. असं अमीन हाजी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आमिरचे त्याच्या एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याबरोबरच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. घटस्फोटानंतरही दोघींशी आमिरचे प्रेम आणि आदराचे संबंध कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.
सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना अमीन हाजी आणि त्यांच्या पत्नी शार्लट यांनी आमिर खानने आपल्या कुटुंबातील नाती कशाप्रकारे जपली आहेत, याबद्दल भाष्य केलं. यात आमिरच्या एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याबरोबरच्या नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. शार्लट म्हणाल्या, “त्याने त्याच्या एक्स पत्नींबरोबरच्या नात्यांमध्ये कोणताही बदल होऊ दिलेला नाही. कुटुंबातील नाती त्याने ज्या पद्धतीने जपली आहेत, ती दिखाव्यासाठी नाहीत. त्यांच्यात खरं प्रेम आहे.” हाजी यांनी पुढे सांगितलं की, आमिर स्वतः गंमतीत म्हणतो की, “मी पतीपेक्षा एक चांगला एक्स पती आहे.”
आमिर त्याच्या एक्स पत्नींच्या स्वतंत्र ओळखीचा आदर करतो – अमीन हाजी
हाजी यांनी आमिरने त्याच्या एक्स पत्नींच्या वैयक्तिक स्वतंत्र ओळखीचा नेहमीच आदर केल्याचंही सांगितलं. “रीना दत्ता आजही रीना दत्ता आहेत. आमिर त्यांचा त्यांच्या स्वतंत्र ओळखीचा आदर करतो, त्यामुळे त्यांनी धर्म किंवा आडनाव बदललं नाही. इरा आणि जुनैद या दोघांचीही नावं रीना यांनीच ठेवली” असं त्यांनी सांगितलं.
आमिर खानने काही दिवसांपूर्वीच गौरी स्प्रॅटबरोबर लग्न केलं आहे. यापूर्वी त्याचं लग्न रीना दत्ता यांच्यासोबत झालं होतं. या दोघांना जुनैद आणि इरा ही दोन मुलं आहेत. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी लग्न केलं. या दोघांना २०११ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आझाद हा मुलगा झाला. २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी विभक्त होण्याची घोषणा केली.
दरम्यान, आमिर खान अनेकदा त्याच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबद्दल तसेच एक्स पत्नींबद्दलही मकोळेपणाने बोलताना दिसतो.
