ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी ‘हम दिल दें चुके सनम’, ‘देवदास’, ‘सरफरोश’ अशा अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आमिर खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय ते रणबीर कपूर अशा लोकप्रिय कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केलीये. नुकत्याच ‘आरपार मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या स्टार कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
स्मिता जयकर सांगतात, “सलमान-शाहरुख-ऐश्वर्या ही सगळी मोठी नावं आहेत यात शंका नाही. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच त्यांना एवढी प्रसिद्धी मिळालीये. पण, यापलीकडे जाऊन हे स्टार कलाकार सुद्धा साधी माणसंच आहेत. त्यामुळे मी नेहमी पाहिलंय…बाहेर किंवा मीडियामध्ये काहीही चर्चा असो पण, एक कलाकार दुसऱ्या कलाकारासमोर कधीच रुबाब किंवा अॅटिट्यूड दाखवत नाही…अजिबातच नाही! त्यांचे आपआपसांत काहीतरी मतभेद असू शकतात…त्याबद्दल कोणालाही कल्पना नसते. पण, सेटवर असं समोरून काहीच दाखवत नाहीत.”
“कारण, एखाद्या स्टार कलाकाराने सेटवर येऊन रुबाब दाखवला आणि आपला सहकलाकार जर नर्व्हस झाला तर, सीन खराब होतात. त्यामुळे प्रत्येक कलाकार याबाबतीत फार स्वार्थी असतो आणि सीन खराब होऊ देत नाहीत. सलमान म्हणा, शाहरुख म्हणा किंवा आमिर हे सगळे स्टार अभिनेते सुद्धा माणुसकीला खूप चांगले आहेत. त्यांच्याबद्दल जे काही बोललं जातं किंवा ज्या चर्चा ऐकू येतात..त्या सगळ्याच खऱ्या नसतात. त्यामुळे अशा गोष्टींवर फार विश्वास ठेवायचा नाही.” असं स्मिता जयकर यांनी सांगितलं.
आमिर खान सीनमध्ये खरंच हस्तक्षेप करतो का?
पुढे, आमिर खानबद्दलचा किस्सा सांगत त्या म्हणाल्या, “आता आमिर खानबद्दल बोललं जायचं की, तो सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये हस्तक्षेप करतो. आता मी जेव्हा त्याच्याबरोबर काम केलं…तेव्हा मला तरी असं काही जाणवलं नाही. आमिर जर एखाद्या सीनमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला तो हस्तक्षेप का वाटतो?”

‘सरफरोश’ सिनेमाचा दिग्दर्शक जॉन मॅथ्यू होता. त्याच्यापेक्षा जास्त हा सिनेमा आमिरनेच डायरेक्ट केला अशा चर्चा त्याकाळी रंगल्या होत्या. याबाबत स्मिता जयकर म्हणतात, “अजिबात असं काहीच नाहीये…कारण, माझी त्या सिनेमात बरीच मोठी भूमिका आहे. त्यामुळे मी जवळून पाहिलं होतं. आमिर फक्त सांगायचा…आपण असं करून पाहिलं तर? आता माझा एक सीन होता…त्यात सगळे कलाकार फ्रेममध्ये होते पण, मूळ तो सीन माझा होता. त्यावेळी आमिरने स्वत: मला सांगितलं होतं की, स्मिता हा तुझा सीन आहे…तुला ज्याप्रकारे करायचा आहे तसा तू कर! तो सिनेमाचा हिरो असूनही त्याने जराही हस्तक्षेप केला नव्हता. त्याने माझा सीन मला हवा तसा करू दिला होता.”

त्यामुळे अफवांवर तसेच सोशल मीडियावरील खोट्या चर्चांवर विश्वास ठेवू नका, असंही स्मिता जयकर यांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे.
