आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनीत व निर्मित ‘लगान’ हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंत बनलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल एक मानला जातो. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटाची कथा जितकी आयकॉनिक आहे. तसेच या चित्रपटाच्या सेटवरचे किस्सेसुद्धा तितकेच अविस्मरणीय आहेत. यापैकीच एक म्हणजे आमिर खानने चक्क या चित्रपटाच्या सेटवर सहकलाकाराचं लग्न लाऊन दिलं होतं.
अलीकडेच ‘लगान’मध्ये मंदिरातील ढोलवादक बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता अमिन हाजीने (Amin Hajee) एक खास आठवण सांगितली. त्याने ‘लगान’च्या सेटवर त्याच्या पत्नीशी भेट कशी झाली, याबद्दल खुलासा केला. तसंच, त्याच्या मेव्हण्याने त्याच्या प्रेयसीशी ‘लगान’च्या सेटवरच लग्न केलं होतं. विशेष म्हणजे, त्या लग्नात आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी रीना दत्ता यांनी वधूच्या आई-वडिलांची भूमिका निभावली होती. याबद्दल सांगितलं आहे.
पीटीआयशी संवाद साधताना अमिन हाजीने सांगितलं की लगानसाठी आशुतोष गोवारीकर क्रिकेट खेळता येणाऱ्या फॉरेनरच्या शोधात होते आणि त्यावेळी त्याचा मेहुणा जेमी(पत्नीचा भाऊ) ज्याला क्रिकेट खेळता येत होतं त्याची निवड झाली आणि दिग्दर्शकांनी त्याला त्याच्या कुटुंबातील महिला सदस्यांना सोबत घेऊन यायला सांगितलं होतं. जॅमी त्याच्या बहिणीला घेऊन आला जी नंतर अमिन हाजीच्या प्रेमात पडली.
ते म्हणाला, “माझी पत्नी शार्लोटने नुकतंच मानववंशशास्त्राचं (Anthropology) शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यामुळे तिला वेगवेगळ्या लोकांना जवळून पाहण्याची उत्सुकता होती. ती तिच्या भावाबरोबर ‘लगान’च्या सेटवर आली. तिथे तिने मला पाहिलं आणि हा काहीसा वेगळाच नमुना आहे, याच्यावर संशोधन करायला हवं, असा विचार केला. त्यानंतर आता २५-२६ वर्षे झाली असून ती अजूनही माझ्यावर संशोधनच करत आहे” असं तो गमतीत म्हणाला.
आमिर खान व पहिल्या बायकोने पार पाडलेली पालकांची जबाबदारी
मेव्हणा जेमीच्या खऱ्या लग्नाबद्दल सांगताना अमिन हाजी म्हणाला, “माझ्या पत्नीचा भाऊ जेमी त्याच्या प्रेयसीशी लग्न करत होता. आम्ही तिला ‘कॅटकिन’ म्हणायचो, पण तिचं खरं नाव कॅथरीन होतं. ‘लगान’च्या सेटवरील त्याच मंदिरात त्यांचं लग्न झालं, जिथे माझं बाघा हे पात्र मंदिरात ढोलवादक म्हणून राहायचं. त्या लग्नात रीना दत्ता आणि आमिर खान यांनी वधूच्या आई-वडिलांची भूमिका निभावली. तर ‘लगान’चे कलाकार आणि तंत्रज्ञांची संपूर्ण टीमच वरातीमध्ये सहभागी झाले होते. त्या दिवसाच्या अनेक सुंदर आठवणी आमच्याकडे आहेत. तो अनुभव खरोखरच खास होता.”
अलीकडेच ‘लगान’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली आहेत आणि आमिर खानच्या निर्मिती संस्थेलाही २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानेच आमिर खानने पार्टीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला सलमान खान, करीना कपूर, काजोल यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
