बॉलीवूड अभिनेता आमिर खान येत्या काळात तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसह लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर आमिर तिच्याबरोबर आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाबरोबर एकत्र राहत आहे. पण, अनेकांना माहित नसेल की आमिर खानची गर्लफ्रेंड कोणत्या क्षेत्रात काम करते आणि तिची कौटुंबिक पार्शवभूमी काय आहे.

आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी अनेकदा त्याच्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावते. दोघांचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघे अनेकदा कुटुंबीयांबरोबरही स्पॉट झाले आहेत. अभिनेत्याने स्वत: त्याच्या ६०व्या वाढदिवशी पार्टित गौरीची सगळ्यांना ओळख करुन दिली होती. पण, आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी काय काम करते याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

आमिर खानची गर्लफ्रेंड कोणत्या क्षेत्रात काम करते?

गौरी स्प्रॅटबद्दल बोलायचं झालं तर DNAच्या वृत्तानुसार गौरी मेघन स्प्रॅट ही बंगळुरूमधील उद्योजिका असून ती एका सहा वर्षांच्या मुलाची आई आहे. तिची आई रीटा स्प्रॅट या बेंगळुरूमधील स्प्रॅट हेअर स्टुडिओ सलूनच्या मालकीण आहेत. आमिर खानच्या होणाऱ्या सासूबाई पंजाबी-आयरिश वंशाच्या आहेत, तर तिचे वडील रॉबर्ट स्प्रॅट हे तमिळ-ब्रिटिश वंशाचे आहेत.

गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलं. तिथून तिने स्टायलिंग, फोटोग्राफी आणि फॅशन या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. माध्यमांशी गौरीची ओळख करून देताना आमिरने सांगितलेलं की, तिचे आजोबा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. फिलिप स्प्रॅट हे ब्रिटिश लेखक होते आणि ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. १९२९ मध्ये झालेल्या Meerut Conspiracy Case प्रकरणातील आरोपींमध्ये त्यांचा समावेश होता आणि त्यांना तुरुंगवासही झाला होता.

अन् मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं

आमिर आणि गौरी एकमेकांना जवळपास २० वर्षांपासून ओळखत होते, मात्र काही मध्ये त्यांचा संपर्क तुटला होता. वृत्तांनुसार, काही वर्षांपूर्वी आमिरच्या चुलत भावामार्फत त्यांची पुन्हा ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि पुढे ते एकमेकांना डेट करू लागले.

गौरी तिची बहीण शौना स्प्रॅटबरोबर बीब्लंट सलूनमध्ये संचालक म्हणून काम पाहते. हे सलून हेअरस्टायलिस्ट आणि अधुना भबानी यांनी सह-स्थापन केलं होतं. २०१२ मध्ये गौरी ‘द लेदर बुटीक’मध्ये सल्लागार डिझायनर म्हणूनही कार्यरत होती.

गौरी पूर्वी बंगळुरूमध्ये राहत होती. मात्र नंतर ती मुंबईत स्थायिक झाली असून सध्या आमिरबरोबर राहत आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार, आमिर आणि गौरी ५ जुलै २०२६ रोजी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.