Aamir Khan All Is Well Song Story :आमिर खानच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे सगळ्यांचा आवडता ‘३ इडियट्स.’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या रँचोची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या सिनेमातून पाहायला मिळतो. नावडत्या क्षेत्रात मन मारून काम करण्यापेक्षा आवडत्या कामात आपलं मन गुंतवा. यशाच्या मागे पळण्याऐवजी आनंदाचा शोध घ्या, असा एक संदेश या सिनेमातून मिळतो.
‘३ इडियट्स’ सिनेमाची कथा आणि सिनेमाच्या प्रत्येक संवादामधून रोजच्या जगण्यासाठीच्या अनेक गोष्टी वेचण्यासारख्या आहेत. केवळ संवादचे नव्हे, तर सिनेमाच्या गाण्यातूनही काही न काही उपदेश मिळतोच. या सिनेमात ‘झुबी झुबी’, ‘बेहती हवा सा था वो’, ‘Give Me Sunshine’ सह आणखी एक लोकप्रिय गाणं आहे, ते म्हणजे ‘ऑल इज वेल’ गाणं.
‘३ इडियट्स’मधल्या ‘ऑल इज वेल’ या थिरकायला भाग पाडणाऱ्या गाण्यात एक फिलॉसॉफीही आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? हे गाणं चक्क एका मीमवरून तयार झालं आहे. स्वत: गाण्याच्या गीतकारानं हा किस्सा शेअर केला आहे. बॉलीवूडचे लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांनी ‘३ इडियट्स’मधल्या ‘ऑल इज वेल’ गाण्यामागचा रंजक किस्सा सांगितला आहे. लोकसत्ताच्या ‘अभिजात Litfest’ या कार्यक्रमात स्वानंद यांनी ‘ऑल इज वेल’ हे गाणं सुचलं कसं? गाणं तयार करण्याची नक्की काय पद्धत होती? याबद्दल सांगितलं आहे.
‘ऑल इज वेल’ हे गाणं सिनेमाच्या स्क्रिप्टचा भाग होता. ‘ऑल इज वेल’ हे टायटल आणि त्यावर एक गाणं करायचं हे सुरुवातीलाच ठरलं होतं, त्यामुळे ‘ऑल इज वेल’ हा माझा शोध नाही. पण, त्यावर बाकीचं गाणं कसं करता येईल याचा विचार सुरू होता. तेव्हा इंटरनेट अगदीच सुरू झालं होतं, त्यामुळे इंटरनेटवर शोधून शोधूनच त्या गाण्याचे शब्द लिहिले आहेत; त्यामुळे ‘ऑल इज वेल’ गाण्यात इतकी काव्यात्मकता नाही.
कॉलेजच्या मुलांसाठीचं गाणं हवं असा त्यामागचा पहिला विचार होता. पण, तरीसुद्धा त्यात काहीतरी फिलॉसॉफी ही हवीच होती, नाही तर त्याला काही गंमत नाही; त्यामुळे आम्ही गाणं कसं असलं पाहिजे? त्यात नक्की काय करता येईल? हे इंटरनेटवर शोधत होतो. तर मला इंटरनेटवर एक मीम (Meme) दिसलं. ते मीम असं होतं की, एक कोंबडीचं पिल्लू तव्यावरील हाफ फ्रायकडे बघून असं म्हणतंय की, ‘Is That You, Brother?’ आणि मला त्याचवेळी गाण्यातली ‘मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाईफ मिलेगी या क्या होगा?’ ही ओळ सुचली. त्यावर मग एकेक ओळी लिहित गेलो.”
‘३ इडियट्स’मधल्या ‘ऑल इज वेल’ गाण्याचा रंजक किस्सा
दरम्यान, ‘३ इडियट्स’ या चित्रपटात आमिर खानसह आर. माधवन, शर्मन जोशी, करिना कपूर आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. या चित्रपटाला देशातच नाही, तर परदेशातही पसंती मिळाली होती. आजही हा चित्रपट आणि त्यातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
