आमिर खान व जिनिलीया देशमुख हे दोघे लवकरच ‘सितारे जमीन पर’मधून एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटामधून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. जिनिलीयाचा पहिला चित्रपट ‘जाने तू या जाने ना’साठी आमिर खाननेच तिची निवड केली होती. यामध्ये अभिनेत्याचा भाचा इमरान खान जिनिलीयासह मुख्य भूमिकेत झळकला होता. परंतु, आमिरमुळे जरी जिनिलीयाला तिचा पहिला चित्रपट मिळाला असला तरी या दोघांनी आजवर कधीच एकत्र काम कलेलं नाही.
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट येत्या २० जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त आमिर खानने ‘इंडियन एक्स्प्रे’ला मुलाखत दिली आहे. आमिर खान ६० वर्षांचा आहे, तर जिनिलीया ३७ वर्षांची आहे. या दोघांमध्ये २३ वर्षांचं अंतर आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये जिनिलीया व त्याच्यामध्ये असलेल्या २३ वर्षांच्या वयातील अंतराबाबत विचारण्यात आलं होतं. यावर तो म्हणाला, “हो, तो विचार मीसुद्धा केला होता, पण चित्रपटामध्ये आम्ही दोघेही चाळिशीतील भूमिका साकारत आहोत”.
“मी ६० वर्षांचा आहे, पण आजच्या काळात आपण व्हीएफएक्सचा वापर करू शकतो, पूर्वी असं नव्हतं”. पुढे आमिरने आताच्या काळात व्हीएफएक्सच्या मदतीने या गोष्टी सोप्या झाल्याचं म्हटलं आहे. ‘सितारे जमीन पर’ हा ‘तारे जमीन पर’ या २००७ साली आलेल्या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. पण, ‘सितारे जमीन पर’ हा एका हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी आमिर खानला ट्रोलही करण्यात आलं होतं.
दिग्दर्शक आर. एस. प्रसन्न यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘सितारे जमीन पर’मधून आमिर खानच्या आई झीनत खान यांनी पहिल्यांदाच चित्रपटात काम केलं आहे. आर. एस. प्रसन्न यांच्या आग्रहाखातर आमिर खानने त्याच्या आईला चित्रपटात काम करण्याबाबत विचारलं होतं. त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या चित्रपटासाठी झीनत खान यांनी दोन शॉट दिले असल्याचे आमिर खानने नुकतंच एका मुलाखतीमधून सांगितलं होतं