आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणूनही संबोधलं जातं. प्रत्येक भूमिकेच्या गरजेनुसार स्वत:मध्ये बदल करणारा, प्रत्येक भूमिकेसाठी अनेक महिने तयारी करणारा आणि कोणतंही काम अर्धवट न सोडणारा अभिनेता अशी त्याची ओळख आहे. मात्र, कॅमेऱ्यामागे, पुरस्कार आणि बॉक्स ऑफिसच्या यशापलीकडे आमिर खान तीन मुलांचा बाबा आहे. जुनैद, इरा आणि आझाद या तीन मुलांच्या पालकत्वाबद्दल आमिरने मत व्यक्त केलं आहे. मुलांचं संगोपन कसं करावं, याबद्दल त्याने मांडलेले विचार अनेक भारतीय पालकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत.
भारतात जिथे मुलांनी शाळेत मिळवलेल्या गुणांना आणि क्रमांकाला यशाचं मोजमाप मानलं जातं, तिथे आमिर खानने याबाबत वेगळंच मत मांडलं आहे. त्याला त्याची मुलं वर्गात पहिली यावीत, अशी अपेक्षा नाही. उलट, ती आनंदी राहावीत, त्यांच्या मनात जिज्ञासा असावी आणि जगाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता कायम राहावी, अशी त्याची इच्छा आहे. मुलांनी सतत प्रश्न विचारावेत, नव्या गोष्टी शिकाव्यात आणि गुणपत्रिकेपेक्षा त्यांना खरोखर ज्या गोष्टीची आवड आहे, त्याचा पाठपुरावा करावा, असं आमिरचं मत आहे. मुलांच्या यशाचं मोजमाप केवळ टक्केवारीत करणाऱ्या अनेक पालकांसाठी आमिरचे हे विचार निश्चितच विचार करायला लावणारे आहेत.
आमिर खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या मुलांना ऐषारामाचं आयुष्य जगणं सहज शक्य आहे. मात्र, आमिरने त्याच्या मुलांना तशी सवय लावली नाही. उलट, साधेपणा आणि स्वावलंबनाची शिकवण देणं त्याने अधिक महत्त्वाचं मानलं.
आमिर खान काय म्हणाला?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आमिर म्हणाला, “माझी तिन्ही मुलं अतिशय संवेदनशील आहेत. याचा मला सर्वाधिक अभिमान आहे. त्याचबरोबर ती माझ्या संपत्तीवर अवलंबून नाहीत किंवा तिचा उपभोग घेण्यात त्यांना रस नाही. साधेपणा आणि स्वावलंबनाला ते अधिक महत्त्व देतात. एक पालक म्हणून याच गोष्टीचं मला सर्वाधिक समाधान वाटतं.”
आमिरच्या मते, मुलांना सर्व सुखसोयी देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी, नम्र आणि जमिनीशी जोडून ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्या मते, पालकांनी मुलांना केवळ संपत्तीच नव्हे, तर योग्य संस्कार आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी तयार केलं पाहिजे.
