Aamir Khan Praises Ranveer Singh Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधल्या कलाकारांसह बॉलीवूडच्या काही स्टार्सनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशातच आता या चित्रपटाबद्दल बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खानने आदित्य धर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. आमिरने आपल्या ‘आमिर खान प्रॉडक्शन’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ पाहून काय म्हणाला आमिर खान?
‘आमिर खान प्रॉडक्शन’च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने दिग्दर्शक आदित्य धर, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन व राकेश बेदी यांना टॅग केले. तसेच पुढे त्याने लिहिले, ” ‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! तुमच्या जिद्द आणि मेहनतीने प्रेक्षकांच्या मनावर खरोखरच मोहिनी घातली आहे.”
या चित्रपटाबद्दल बोलण्याची आमिरची ही पहिलीच वेळ नाही. आयएफएफ (IFF) २०२६ मध्येही त्याने ‘धुरंधर २’बद्दल प्रतिक्रिया दिली होती. दिल्लीतील पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी त्याला चित्रपटाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा त्याने हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचे प्रांजळपणे मान्य केले होते.
आमिरने एएनआय (ANI)शी बोलताना सांगितले होते, “मी अजून चित्रपट पाहिलेला नाही; पण मी फक्त त्याचे कौतुकच ऐकत आहे. ‘धुरंधर १’ आणि आता ‘धुरंधर २’, या दोन्ही चित्रपटांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. माझ्याकडून संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.” अशातच आता त्याने चित्रपट बघून, त्यावर कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली आहे.
‘आमिर खान प्रॉडक्शन’द्वारे शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना आमिरने त्याच्या चित्रपट बघण्याच्या सवयीबद्दल सांगितले होते. “मी चित्रपट पाहत नाही. मला वाचायला आवडते. जेव्हा लोकांकडे मोकळा वेळ असतो, तेव्हा ते चित्रपट किंवा वेब सीरिज पाहतात; पण मी वाचन पसंत करतो.” असं तो म्हणाला होता. मात्र, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट आमिरसाठी अपवाद ठरला आहे.
दरम्यान, ‘धुरंधर : द रिव्हेंज’बद्दल सांगायचे झाले तर, १९ मार्च रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ १२ व्या दिवशी भारतात १७.८० कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात देशांतर्गत १७० कोटींहून अधिक कमाई करत एकूण ९३७.३२ कोटींचा आकडा गाठला आहे. चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन आता १,४९२.१७ कोटी रुपये झाले आहे.
