अभिनेता आमिर खानने ५ जुलै २०२५ रोजी गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसरं लग्न केलं. त्याच्या लग्नानंतर तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतोय. “आमिर खान लव्ह जिहादचा ब्रांड अँबेसेडर होतोय का?” असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर संजय शिरसाट व विहिंपकडून त्याच्या लग्नावर टीका झाली. आता आमिर खानने त्याच्या तिसऱ्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंग व टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खानने म्हटलंय की त्याच्या कुटुंबाने नेहमीच वेगवेगळ्या धर्मातील लोकांबरोबरची नाती स्वीकारली आहेत. तसेच त्याच्या कुटुंबातील कोणत्याही लग्नासाठी आजपर्यंत धर्म परिवर्तन झालेलं नाही.
‘रेडिफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने सांगितलं की, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन लोकांशी नोंदणी पद्धतीने कायदेशीर लग्ने केली आहेत. तसेच त्याच्या दोन्ही एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव, तसेच आताची तिसरी पत्नी गौरी स्प्रॅट यांनी कधीही धर्म परिवर्तन केलेलं नाही, असंही आमिर खानने स्पष्ट केलं.
माझ्या बहिणी व मुलीने हिंदूंशी केलंय लग्न
‘लव जिहाद’च्या आरोपांना उत्तर देताना आमिर खान म्हणाला, “आमचं कुटुंब खूप मिळूनमिसळून राहणारं आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं आहे, हेच सत्य आहे. माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न हिंदू मुलांशी झाले आहे, माझ्या मुलीचे लग्नही एका हिंदू मुलाशी झाले आहे. माझ्या चुलत भावाने, मन्सूरने एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केलं आहे.”

गौरी, रीना किंवा किरण यांनी कधीच धर्म बदलला नाही
आमिर पुढे म्हणाला, “गौरी, किरण राव किंवा रीना दत्ता यांपैकी कोणीही आपला धर्म बदलला नाही, कारण आमचे लग्न कायदेशीररित्या नोंदणी पद्धतीने झाले होते. गौरी तर हिंदूही नाही, ती ख्रिश्चन आहे आणि तीसुद्धा अशी ख्रिश्चन जी तिच्या धर्माचे फार कडक पालन करत नाही. जसजसा वेळ पुढे जातोय, तसतसं आयुष्य आणखी मजेदार होत चाललं आहे.”
आमिर खानचे आधीचे दोन लग्न व घटस्फोट
आमिर खानने रीना दत्ताशी १८ एप्रिल १९८६ रोजी पहिलं लग्न केलं होतं. आमिर मुस्लीम व रीना हिंदू असल्याने त्यांच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी घरच्यांना न सांगता नोंदणी पद्धतीने गुपचूप लग्न केले होते. त्यांना जुनैद व आयरा ही दोन अपत्ये आहेत. आयराचं लग्न नुपूर शिखरेशी झालंय.
आमिर खानने २००२ मध्ये रीनाला घटस्फोट दिला. त्यानंतर दिग्दर्शिका किरण राव हिच्याशी २००५ साली लग्न केलं. त्यांना सरोगसीद्वारे आझाद राव खान हा मुलगा झाला. १५ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये आमिर व किरण यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर आमिरच्या आयुष्यात गौरी आली आणि जवळपास ३ वर्षे डेट केल्यावर त्यांनी ५ जुलै २०२६ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.
