आमिर खान ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. पण त्याच्याकडून काही चूक झालीच, तर त्याला थेट सुनावणारी एकच व्यक्ती आहे—ती म्हणजे रीमा कागती. याची सुरुवात २००१ मध्ये आलेल्या ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रीमा कागती लगानची सहाय्यक दिग्दर्शक होती. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी, म्हणजेच २०१२ मधील ‘तलाश’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही रीमाचा हाच धाक कायम राहिला.

सचिन तेंडुलकरच्या पार्टीमुळे आमिरला झाला उशीर

‘दिल चाहता है’ चित्रपटाच्या गेट-टुगेदर कार्यक्रमात आमिरने ‘तलाश’च्या सेटवरील रीमाची एक मजेदार आठवण सांगितली. आमिर त्याचा जवळचा मित्र आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या पार्टीला गेला होता, त्यामुळे त्याला उशीर झाल्याने रीमा भडकली होती.

आमिर हसत म्हणाला, “त्या दिवशी तलाशचे रात्रीचे शूटिंग होते आणि मला रीमाचा स्वभाव माहीत होता. सचिन एक ‘नॅशनल आयकॉन’ असल्याने हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा होता. मी रीमाला विनंती केली की मी शूटिंगला एक तास उशीरा आलो तर चालेला का? ती आतून चिडली होती, पण तिने होकार दिला. मात्र, पार्टीत पाहुणे उशिरा आल्याने सचिन सर्वांना म्हणाला, ‘प्लीज थांबा, मी एका खास व्यक्तीची वाट पाहतोय.’ आता तिकडे रीमा वाट पाहतेय हे मी सचिनला सांगू शकत नव्हतो. त्यामुळे मी विचार केला, ठीक आहे, आज सचिनसाठी रीमाचा ओरडा खाऊ.”

‘हा तुझा प्रोफेशनलिझम आहे का?’

आमिरला सेटवर पोहोचायला तब्बल चार-पाच तास उशीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे रीमा त्याच्यावर प्रचंड भडकली. “तुझी उशिरा येण्याची हिम्मतच कशी झाली? हाच का तुझा प्रोफेशनलिझम?” अशा शब्दांत तिने आमिरची शाळा घेतली. आमिरने हसत कबूल केलं की त्यावेळी रीमाने पुन्हा त्याच्या सगळ्या चुकांचा पाढा वाचला होता. दरम्यान, ‘तलाश’नंतर या दोघांनी अद्याप एकत्र काम केलेलं नाही.

‘लगान’च्या सेटवरही आमिरवर ओरडली होती रीमा कागती

यापूर्वीच्या एका मुलाखतीत आमिरने ‘लगान’च्या सेटवरील असाच एक किस्सा सांगितला होता. रीमा तेव्हा सर्व कलाकारांच्या वेळेचं नियोजन पाहायची. आमिर म्हणाला, “सेटवर नाश्त्यासाठी १५ मिनिटे मिळायची. मी खूप हळू खातो, म्हणून मी रीमाला मला १५ मिनिटं आधी बोलवायला सांगितलं. त्यावर ती थेट ओरडली, ‘तुझ्या एकट्यासाठी पूर्ण हेअर आणि मेकअप टीम १५ मिनिटं आधी येणार नाही.’ मी चित्रपटाचा निर्माता असूनही ती माझ्यावर ओरडली, याचं मला वाईट वाटलं आणि मी रागात नाश्ता करणंच सोडून दिलं. पण रीमावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही; ती उलट म्हणाली, ‘खूप छान, मग तू वेळेवर तयार होऊ शकशील.’ शेवटी आठवड्याभराने कंटाळून मी पुन्हा आधीसारखाच नाश्ता करायला लागलो.”