Aamir Khan Personal Life Secrets: बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘एक दिन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, मात्र एका ताज्या मुलाखतीत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेले खुलासे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या ३०-३५ वर्षांपासून फक्त कामाला महत्त्व दिल्याने मुलं जुनैद आणि आयरा यांच्यापासून आपण भावनिकदृष्ट्या दूर गेलो, अशी प्रांजळ कबुली आमिरने दिली आहे. कोरोना काळात मिळालेल्या वेळेत स्वतःच्या चुकांची जाणीव झाल्याचे सांगत आमिरने आपली पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता, किरण राव आणि सध्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्यावरही मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
आमिर खान म्हणाला की, बराच काळ तो फक्त चित्रपट, अभिनय आणि चित्रपट निर्मितीमध्येच बुडालेला होता. सुमारे ३०-३५ वर्षे त्याचे पूर्ण लक्ष फक्त कामावरच होते, ज्यामुळे तो आपली मुलं जुनैद खान आणि आयरा खान यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडला जाऊ शकला नाही. त्याला त्याच्या दिग्दर्शकांची मतं, त्यांची भीती आणि स्वप्ने याबद्दल सगळं माहित असायचं, पण तो स्वतःच्या मुलांना इतक्या जवळून ओळखू शकला नाही, याचा त्याला आज खूप पश्चात्ताप होतोय.
करोना काळात काम थांबलं, तेव्हा त्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली. त्याच वेळी त्याला जाणीव झाली की, नात्यांच्या बाबतीत त्यानं खूप काही गमावलंय, जे परत मिळवणं सोपं नाही. त्यानंतर त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि आता तो आपले कुटुंब, मुले, आई, मित्र आणि जवळच्या व्यक्तींना पूर्वीपेक्षा जास्त वेळ आणि महत्त्व देतोय.
एक्स पत्नी व गर्लफ्रेंड गौरीबद्दल आमिर खानचे वक्तव्य
आपल्या वैयक्तिक नात्यांबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबतचं त्याचं नातं खूप घट्ट होतं, तरीही ते टिकू शकले नाही. नात्यात ओढ असूनही अनेकदा काही कारणास्तव नाती टिकत नाहीत, असं आमिरने मान्य केलं. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबद्दल आमिर म्हणाला, “गौरी माझ्या आयुष्यात आली यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. गौरीसोबत मला खूप आनंदी वाटतं, शांत वाटतं आणि आता आयुष्य खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय असं वाटतं. आता मी आयुष्यात शांतता आणि समतोल अनुभवतोय.”
प्रत्येक माणूस चुका करतो आणि त्यातून शिकतो, चुकांमधून माणसाने शिकणं हीच हीच खरी प्रगती आहे, असंही आमिर खानने नमूद केलं. त्याच्या मते, स्वतःच्या चुका मान्य करणे हा कमकुवतपणा नाही, तर ताकद आहे. एक माणूस आणि एक कलाकार म्हणून आपण स्वतःला सतत अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आमिर खानने सांगितलं.
आमिर खान शेवटचा ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसला होता. सध्या तो त्याच्या ‘एक दिन’ या प्रॉडक्शन प्रोजेक्टच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, त्याचा आगामी चित्रपट ‘लाहोर १९४७’ देखील सध्या चर्चेत आहे.
