गेली काही दशकं बॉलीवूडवर आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांचं साम्राज्य आहे. या तीन अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. एक काळ असा होता की प्रेक्षक केवळ हे कलाकार असलेलेच चित्रपट पाहायचे, पण आता ही परिस्थिती बदलली आहे. आज चित्रपट आवडला नाही तर कितीही मोठा स्टार असलेल्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात.
अशातच आमिर खानचा पुतण्या आणि अभिनेता इम्रान खानने त्या पिढीतील कलाकारांनी आता आपल्या वयाची जाणीव ठेवून वयाला साजेश्या अशाच भूमिका स्वीकारायला हव्यात असं मत व्यक्त केलं. “एका विशिष्ट वयानंतर मुख्य नायकाची भूमिका करता येत नाही,” असे त्याने स्पष्टपणे सांगितलं.
SHOWSHA शी बोलताना तिन्ही खानबद्दल विचारले असता इम्रान म्हणाला, “नायक म्हणून काम करण्यालाही एक मर्यादा असते. एका विशिष्ट वयात तुम्ही मुख्य भूमिका करू शकता, पण एका वयानंतर त्या भूमिका साकारणे योग्य वाटत नाही. सध्या तिन्ही खान वयाच्या साठीत आहेत. त्यांनी जवळपास ३० वर्षे त्यांचं स्टारडम अनुभवलंय. पण, वय वाढत गेले की त्या त्या वयातल्या भूमिका बदलणे ही प्रत्येक कलाकाराच्या प्रवासातील नैसर्गिक गोष्ट आहे.”
स्टारडम कसे बदलते याबद्दल तो पुढे म्हणाला, “तुमच्याबरोबर वाढणारा एक प्रेक्षकवर्ग असतो, पण त्याचवेळी नवी तरुण पिढीही तयार होत असते. ही पिढी आपल्या वयाच्या आणि अनुभवाच्या जवळ असलेल्या कलाकारांशी अधिक जोडली जाते. चित्रपट पाहताना प्रेक्षक स्वतःला त्या कथा आणि पात्रांमध्ये पाहतात, त्यामुळे आपल्या वयाच्या जवळच्या व्यक्तीशी जास्त आपुलकी वाटते. तरुण पिढीला ७० वर्षांच्या व्यक्तीची गोष्ट पाहण्यात फारसा रस नसतो.”
दरम्यान, ‘झिरो’नंतर शाहरुख खानने चार वर्षांचा ब्रेक घेतला आणि ‘पठाण’ व ‘जवान’ या दोन मोठ्या हिट चित्रपटांसह त्याने कमबॅक केलं. मात्र, त्याचवर्षी आलेला ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चालला नाही.
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अपयशी ठरला. यानंतर त्याच्या गेल्यावर्षी आलेल्या ‘सितारे जमीन पर’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली; तर २०१८ नंतर सलमान खानचे बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. ‘टायगर ३’ हा फक्त त्यातील एक अपवाद मानला जातो.

