Chetak Screen Awards 2026: नुकताच चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. अनेक दिवसांपासून या सोहळ्याची चर्चा सुरू होती. मुंबईत हा सोहळा पार पडला.
‘दी इंडियन एक्सप्रेस’ हिंदीचे संपादक सौरभ द्विवेदी, तसेच, झाकीर खान, सुनील ग्रोव्हर, आलिया भट्ट यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. चेतक स्क्रीन अवॉर्डस् २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट कलाकार व तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. त्यामध्ये थिएटर व ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा समावेश होता.
आमिर खानच्या सिनेमाला मिळाला ‘हा’ पुरस्कार
‘धुरंधर’, ‘हक’, ‘सितारे जमीन पर’, ‘होमबाउंड’, ‘धडक २’, ‘सैयारा’, ‘छावा’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आमिर खानच्या सितारे जमीन पर या सिनेमाचादेखील गौरव करण्यात आला. करेज इन सिनेमा (Courage in Cinema) या पुरस्कारने ‘सितारे जमीन पर’ला गौरविण्यात आले.
चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता सिद्धांत रॉय कपूर यांनी हा पुरस्कार दिला. ‘सितारे जमीन पर’चे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आणि चित्रपटातील इतर कलाकारांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सुनीव ग्रोव्हर यांनी या सिनेमाची सुंदर पद्धतीने ओळख करून दिली. तो म्हणाला, “गेल्या वर्षी एक चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे फक्त कथा नव्हती, तर त्यामुळे एका चर्चेला सुरुवात झाली. या चित्रपटात आपल्याला काही अशा आयुष्यांची झलक पाहायला मिळाली, जी आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या पद्धतीने एक स्टार असते, फक्त त्यांना चमकण्यासाठी एक संधी हवी असते, याची या सिनेमानं आपल्याला आठवण करून दिली.”
चित्रपटाचे निर्माते आर. एस. प्रसन्ना यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याचे संपूर्ण श्रेय आमिर खान व चित्रपटातील इतर कलाकारांना दिले. ते म्हणाले, “या सर्व सिताऱ्यांकडून, तसेच त्यांच्यासारख्या अनेकांकडून ज्यांनी आम्हाला त्यांच्या आयुष्यात सामावून घेतले आहे, त्यांच्याकडून मी धाडस या शब्दाचा अर्थ शिकलो आहे. तुमचा केलेला द्वेष आणि तुम्हाला मारलेल्या प्रत्येक टोमण्याला तुम्ही हसण्यात, टाळ्यांमध्ये आणि प्रेमात बदलण्याचे धैर्य दाखवले, त्यासाठी तुमचे अभिनंदन.”
आमिर खानचे कौतुक करत पुढे ते म्हणाले, “आमिरसर उत्तम निर्माते, कलाकार आणि सुपरस्टारपैकी एक आहेत. चित्रपटातील प्रत्येकाचे मनापासून आभार”, असे म्हणत त्यांनी चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराचे कौतुक केले.
दरम्यान, सितारे जमीन पर सिनेमात जिनिलीया देशमुख व आमिर खान यांच्याबरोबरच आरोश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा व सिमरन मंगेशकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले.
