Aamir Khan’s Superhit Film Was Screened In South Korean Schools : आमिर खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. कामाप्रति असलेलं प्रेम, शिस्त आणि प्रत्येक गोष्ट बारकाईनं करण्याच्या त्याच्या सवयींमुळे त्याला इंडस्ट्रीत मिस्टर परफेक्शनिस्ट असंही संबोधलं जातं. आमिर चित्रपटांच्या माध्यमातून नेहमी समाजातील विविध विषयांवर भाष्य करीत असतो. केवळ भारतातच नाही, तर परदेशांतही त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत असतो.
आमिर खाननं ‘३ इडियट्स’, ‘दंगल’, ‘तारे जमीन पर’ यांसारखे समाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तर तो स्वत: या धाटणीच्या चित्रपटांची निर्मितीही करत असतो. २००९ साली आलेल्या त्याच्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेला. आजही त्या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. लहान मुलांपासून पालकांपर्यंत अनेकांनी हा चित्रपट पाहिला आहे. पण, कॉलेजमधील मुलांवर आधारित या चित्रपटात इंजिनियरिंग करणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पालकांचा दबाव आणि परिस्थितीमुळे मुलांना किती तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागतं यावर या चित्रपटात भाष्य केलं गेलं आहे.
आमिर खानचा हा चित्रपट आता सातासमुद्रापार पोहोचला असून, दक्षिण कोरियामधील विद्यार्थ्यांनाही हा चित्रपट दाखवला जात आहे. दोन्ही देशांमधील संस्कृती वेगळी असली तरी चित्रपटाचा विषय मात्र लक्ष वेधून घेत आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार कोरियन विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे वर्गात हा चित्रपट दाखवला जात आहे. एकमेकांबरोबरच्या सततच्या स्पर्धांमुळे मुलांमधील तणाव कमी करण्यासाठी हा चित्रपट वर्गांमध्ये दाखवला जात आहे.
३ इडियट या चित्रपटातून अभ्यासाइतकीच मैत्री आणि कलाहीं महत्त्वाची असते हे पाहायला मिळतं त्यामुळे या चित्रपटाला वर्गांमध्ये आणि वर्गांबाहेर इतकं यश मिळवता आलं आहे. या चित्रपटाला परदेशात मिळत असलेल्या प्रेमातून प्रेक्षकांसाठी संहिता, विषय किती महत्त्वाचा आहे हे पाहायला मिळतं.
दरम्यान, आमिर खानच्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम असून अनेक जण आवडीने हा चित्रपट पाहताना दिसतात. यातील गाणीसुद्धा खूप लोकप्रिय आहेत.

