Aamir Khan Talk About Alcohol Addiction After Divorce : बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या अभिनयासाठी जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. चित्रपट व त्याच्या अभिनयातील काही वेगळे प्रयोग असोत किंवा एखाद्या चित्रपटाचे अपयश मान्य करणे असो, तो नेहमीच प्रामाणिकपणे आपली मते व्यक्त करत आला आहे.

चित्रपट अन् कामाबद्दलच आमिर त्याच्या खाजगी आयुष्याबाबतही अनेकदा मोकळेपणाने बोलला आहे. मग ते किरण रावबरोबरचा घटस्फोट असो किंवा आताची जोडीदार गौरी स्प्रॅटबरोबरचे नाते असो. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत आमिरने पहिली पत्नी रीना दत्तापासून घटस्फोट झाल्यानंतरच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे. पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर आपण दारूच्या आहारी गेल्याचे त्याने सांगितले.

“मी रोज रात्री जवळपास एक बाटली दारू प्यायचो”

बरुण दास यांच्याशी बोलताना आमिर खानने सांगितले की, रीनापासून वेगळे झाल्यानंतरच्या काळात त्याला दारूचे व्यसन लागले होते. तो म्हणाला, “रीनाबरोबर घटस्फोट व्हायच्या आधी मी कधीच दारू प्यायलो नव्हतो. पण ज्यादिवशी ती मुलांना घेऊन घर सोडून गेली आणि त्या रात्री मी घरात एकटाच होतो. मला खूप एकटं एकटं वाटत होतं. त्याआधी मी कधीच दारू प्यायलो नव्हतो. फक्त काही चित्रपटांमधील सीनसाठी मी एखाद दुसऱ्यांदा दारू प्यायली होती. मला दारू अजिबातच आवड नव्हती.”

“पण रीनाबरोबरच्या घटस्फोटानंतरच्या रात्री पाहुण्यांसाठी घरात असलेली दारू मी प्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुढचे दीड वर्ष मी रोज रात्री जवळजवळ एक बाटली दारू पित असे. कधीही दारू न पिणाऱ्या माणसाने अचानक रोज एक बाटली पिणे, ही खरोखरच टोकाची गोष्ट होती”, असेही तो पुढे म्हणाला.

“तो काळ आमच्यासाठी खूप त्रासदायक काळ होता”

यापूर्वी ‘कॉफी विथ करण’मध्येही आमिरने रीना दत्ताबरोबरच्या घटस्फोटाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, “रीना आणि माझे लग्न १६ वर्षे टिकले. जेव्हा आम्ही वेगळे झालो, तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक आणि त्रासदायक होता. आम्ही परिस्थिती शक्य तितक्या चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला. आमचे नाते संपले तरी आमच्या मनातील प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर कधीच कमी झाला नाही.”

दरम्यान, आमिरने रीनाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर २००५ मध्ये किरण रावशी दुसरे लग्न केले. त्यानंतर २०२१ मध्ये १६ वर्षांच्या संसारानंतर आमिर-किरण यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमिरचे त्याच्या दोन्ही एक्स पत्नींबरोबर मैत्री आहे. आमिर सध्या गौरी स्प्रॅटबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.