Aamir Khan’s emotional Video: सध्या अनेक सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत. यामध्ये जुनैद खान व साई पल्लवी यांचा ‘एक दिन’ या सिनेमाचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे, या सिनेमातून लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी बॉलीवू़डमध्ये पदार्पण करत आहे, त्यामुळे आता हा चित्रपट पाहण्यासाठी आणि साई पल्लवीला हिंदी चित्रपटात काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

नुकताच या सिनेमाचा म्युझिकल इव्हेंट पार पडला. याचे नाव एक दिन की मेहफिल असे होते. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओमध्ये आमिर त्याच्या मुलाला जुनैदला स्क्रीनवर पाहून रडताना दिसत आहे. तसेच, त्याने साई पल्लवीबद्दलही वक्तव्य केले आहे.

…अन् आमिर खान रडला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर रडत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो त्याचे डोळे पुसत हसत शेजारी बसलेल्या साई पल्लवीबरोबर बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी आमिरला त्याच्या मुलाला स्क्रीनवर पाहून अभिमान वाटत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

एका व्हिडीओमध्ये आमिर खान साई पल्लवीचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो म्हणतो, “साई पल्लवी ही देशातील सर्वोत्तम अभिनेत्री आहे.” पुढे तो जुनैदबद्दल मजेशीरपणे म्हणाला, “जुनैदनेसुद्धा बरं काम केले आहे.”

एक दिन या सिनेमाबद्दल बोलायचे, तर हा रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले आहे; तर आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. सिनेमात जुनैद व साई पल्लवी प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

जुनैद त्याच्या ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडतो, मात्र त्याला तिच्यासमोर भावना व्यक्त करता येत नाहीत, तो लाजत असतो. ही मुलगी म्हणजे साई पल्लवी असते. साई पल्लवीच्या अपघातानंतर गोष्टीत ट्विस्ट येतो. तिला ट्रान्झिएंट ग्लोबल अम्नेशिया (TGA) हा आजार होतो. या अवस्थेत तिला फक्त जुनैदचीच आठवण येते, कारण जुनैदने तिचा जीव वाचवला होता.

‘एक दिन’ या चित्रपटातून आमिर खान आणि दिग्दर्शक मन्सूर खान अनेक वर्षांनंतर सह-निर्माते म्हणून पुन्हा एकत्र येत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हा चित्रपट १ मे २०२६ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, जुनैद व साई पल्लवीचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.