Aamir Khan Third Marriage: बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खान हा तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबरोबर तो रविवारी (५ जुलै) लग्नगाठ बांधणार आहे. त्याच्या घरीच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याबद्दल त्याने स्वतः मीडियासमोर माहिती दिली होती. त्यानंतर आता आमिरच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. त्याच्या आमिरच्या पाली हिल येथील घराची आकर्षक सजावट केली जात आहे. भरपावसातही आमिरच्या घरी लगीनघाई दिसून येत आहे. सोशल मीडियावर आमिरच्या घराबाहेरील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

आमिर खानने स्वतः त्याचे लग्न होत असून, हा एक घरगुती सोहळा असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “हो, मी ५ जुलैला लग्न करीत आहे. हा विवाहसोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा असून, तो आम्ही घरीच आयोजित करीत आहोत. ५ जुलै हा आमच्यासाठी खूप खास दिवस असणार आहे. हा छोटासा समारंभ असून, त्यामध्ये फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. घराच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करीत आहोत; तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासह कायम राहू दे.”

आमिरचे घर रोषणाईसह सजवण्याचे काम सुरू

आमिर आणि गौरी यांचा विवाह सोहळा अभिनेत्याच्या पाली हिल येथील निवासस्थानी पार पडणार आहे. घरगुती स्वरूपाच्या या सोहळ्यामध्ये अगदी घरातील नातेवाईक आणि जवळाच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे. सध्या आमिरचे घर रोषणाईसह सजवण्याचे काम सुरू आहे. याचे व्हिडीओ पापाराझींनी शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आमिरच्या घरी सुरू असलेली लग्नाची घाई आणि तयारी दिसून येत आहे. या खासगी समारंभाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या सोईसाठी फर्निचर आणतानाही कामगार दिसून आले आहेत.

मात्र, सध्या मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या तयारीला काहीशा अडचणी येताना दिसून येत आहेत. मात्र, भरपावसातही आमिर खानच्या घरी लग्नाची तयारी सुरू आहे. त्यामध्ये कामगार खुर्च्यांची ने-आण करताना आणि घराची सजावट करताना दिसून आले. तयारीचे काम सुरू असताना त्यातील अनेक जण रेनकोट घातलेले दिसले. लग्नाच्या कार्यक्रमांपूर्वी अभिनेत्याची बहीणही त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे दिसून आले. त्याच्या घरासमोर मांडव घालण्यात आला असून, पावसामुळे छतदेखील तयार करण्यात आले आहे.

आणखी खास बाब म्हणजे या विवाहसोहळ्यामध्ये आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची चारही मुलं या लग्नात असणार आहेत. यावेळी आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलं अभिनेता जुनैद खान आणि आयरा खान, दुसरी पत्नी किरण राव व मुलगा आझाद, तसेच गौरी यांच्या मुलाचाही समावेश असणार आहे.

आमिर खानचे हे तिसरे लग्न

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ता यांच्याबरोबर झाले होते. १९८६ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी आमिर फक्त २१ वर्षांचा होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या १६ वर्षांनंतर आमिर व रीना वेगळे झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी २००५ साली लग्न केले. मात्र, २०२१ मध्ये किरण व आमिर यांनी विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असून, गौरी स्प्रॅट हिच्यासह रविवार, ५ जुलै रोजी लग्न करणार आहे.