बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लवकरच आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. वृत्तांनुसार, तो त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटबरोबर ५ जुलै रोजी लग्न करणार आहे. मात्र, लग्नासाठी बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांना बोलवण्यात येणार नसून कुठलाही मोठा सोहळा होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

आमिर खान त्याचं तिसरं लग्न अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या तयारीत आहे. स्क्रीनच्या वृत्तानुसार, आमिर आणि गौरी स्प्रॅट मुंबईतील वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी लग्नाची अधिकृत नोंदणी करणार आहेत. यानंतर एक छोटेखानी विवाहसोहळा पार पडणार असून, या खास समारंभाला दोघांचे कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्रमंडळीच उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे लग्न पूर्णपणे खासगी, साध्या पद्धतीने आणि जवळच्या व्यक्तींच्या सान्निध्यात पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुलं आणि एक्स पत्नींच्या उपस्थितीत करणार लग्न

या विवाहसोहळ्याला आणखी खास आणि भावनिक बनवणारी बाब म्हणजे, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची चारही मुलं या लग्नात असणार आहेत. यावेळी आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलं अभिनेता जुनैद खान आणि आयरा खान, दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद, तसंच गौरी यांच्या मुलाचाही समावेश आहे. या चौघांच्या उपस्थितीमुळे आणि सहभागामुळे हा विवाहसोहळा अधिक भावनिक आणि स्मरणीय ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची पहिली भेट बंगळुरूमध्ये आमिरची चुलत बहीण नुझहत खान हिच्यामार्फत झाली होती. त्यानंतर दोघांनी जवळपास वर्षभर एकमेकांना डेट केलं. गेल्या वर्षी मार्चमध्ये, त्याच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त त्याने माध्यमांशी संवाद साधताना प्रथमच गौरीची त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली होती. सध्या दोघेही मुंबईतील वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी एकत्र राहत आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात आमिरने स्वतः ५ जुलै रोजी गौरीबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली होती.

एकदा गौरीबरोबर लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर आमिरने मिश्कील अंदाजात उत्तर देत म्हटलेलं की, “या वयात लग्न करणं मला शोभत नाही.” त्यानंतर मात्र त्याने कबुली दिलेली आणि म्हणालेला, “गौरीबरोबर आता माझं आयुष्य खूप स्थिर झाल्यासारखं वाटतं”.