Raj Thackeray at Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलीवूड अभिनेता आमिर खानने आज, ५ जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसरं लग्न केलं. आमिर व गौरी यांनी पाली हिल येथील घरी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी हजर होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबरोबर हजेरी लावली. आमिरच्या लग्नातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर खान माध्यमांसमोर आला व त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला. आमिर खान व गौरीचं लग्न झाल्यानंतर राज ठाकरे घरी जायला निघाले. आमिर खान त्यांना गाडीपर्यंत सोडायला पार्किंगमध्ये आला होता. यावेळी राज ठाकरे, राजकुमार हिरानी, आमिर खान व इतर काही जण गप्पा मारताना दिसले. इतकंच नाही तर ते गप्पा मारत जोरजोरात हसत होते. त्यांचा हा व्हिडीओ वूम्प्ला या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

पाहा आमिर खान व राज ठाकरेंचा व्हिडीओ

दरम्यान, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते त्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. ६१ वर्षांच्या आमिर खानने २-३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर गौरी स्प्रॅट हिच्याशी लग्न केलं.

आमिर खानच्या लग्नाला त्याच्या दोन्ही एक्स पत्नी व त्यांची मुलं जुनैद खान, तसेच त्याची लेक आयरा खान व जावई नुपूर शिखरे यांनी हजेरी लावली. त्याचबरोबर आमिरच्या बहिणीही या लग्नाला पोहोचल्या होत्या. राजकुमार हिरानी, रिया चक्रवर्ती, आशुतोष गोवारीकर, राजकुमार संतोषी यांच्यासह अनेकजण या लग्नाला उपस्थित राहिले.

कोण आहे गौरी स्प्रॅट?

गौरी स्प्रॅट ही तमिळ व आयरिश असून तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. आमिर खान आणि गौरी यांची पहिली ओळख जवळपास २५ वर्षांपूर्वी आमिरची चुलत बहीण नुझहत खान हिच्या माध्यमातून झाली होती. २०२४ मध्ये बंगळुरूमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली आणि ते प्रेमात पडले. सुरुवातीला काही महिने हे नातं लाँग-डिस्टन्स होतं. मार्च २०२५ मध्ये आमिर खानने आपल्या ६० व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅट ही आपली ‘पार्टनर’ असल्याचे मीडियासमोर जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गौरी स्प्रॅट हिचं हे दुसरं लग्न असून, तिला पहिल्या लग्नापासून एक ७ वर्षांचा मुलगा आहे. लग्नाच्या फोटोंमध्ये गौरीचा मुलगा पाहायला मिळतोय.