Aamir Khan third marriage with Gauri Spratt : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वयाच्या ६० व्या वर्षी आमिर गौरी स्प्रॅट हिला डेट करत आहे. मागील दीड वर्षांपासून आमिर व गौरी रिलेशनशिपमध्ये आहेत. याबाबत त्यांनी जाहीर कबुलीदेखील दिली होती. आता या जोडीने आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर व गौरी हे त्यांच्या नात्याला लवकरच लग्नामध्ये रुपांतरित करणार आहेत.

अभिनेता आमिर खानने नुकताच त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी आमिर खानने त्याच्या गर्लफ्रेंडशी सर्वांना ओळख करून दिली होती. मीडियासमोर थेटपणे आमिर आणि गौरीने त्यांचे नाते जाहीर केले होते. आता या रिलेशनशिपचे रुपांतर लग्नबंधनामध्ये होणार आहे. आमिर खान व गौरी स्प्रॅट हे घरगुती पद्धतीने लग्न करणार आहेत.

कोणत्या तारखेला होणार आमिर व गौरीचा विवाह?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान पुन्हा एकदा लग्न करणार आहे. येत्या ५ जुलै रोजी आमिर खान गौरी स्प्रॅटसह लग्न करणार असून हा समारंभ अगदी घरगुती असणार आहे. कोणत्याही स्वरूपाचा बडेजाव न करता साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडणार आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह होणार आहे. यामध्ये केवळ घरातील लोक, जवळचे नातेवाईक आणि मित्रांचा सहभाग असणार आहे.

आमिर खानने मीडियासमोर करुन दिली गर्लफ्रेंड गौरीची ओळख

काही महिन्यांपूर्वीच आमिर खाने गौरी स्प्रॅटसह नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यावेळी त्यांनी गौरीसोबत भावनिक नाते असल्याचे मान्य केले होते. आता हे नाते लग्नबंधनामध्ये रुपांतरित होणार आहे. आमिर आणि गौरी गेल्या एक वर्षापासून एकत्र राहत असून एकमेकांसह आनंदी आयुष्य जगत आहेत, त्यामुळे आता कुटुंबीयांच्या आशीर्वादाने नात्याला नवीन वळण देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. आमिरने मीडियासमोर गर्लफ्रेंड गौरीबद्दल सांगितले होते की, ते एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखत होते. पण, एकमेकांच्या संपर्कात नव्हते. दोन वर्षांपूर्वी पुन्हा त्यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. इंडस्ट्रीबरोबर गौरीचा काहीही संबंध नसल्याचे अभिनेता आमिर खानने स्पष्ट केले होते.

आमिर खानचे वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत

बॉलीवूडमध्ये अनेक दशके सुपरहिट चित्रपट देणारा आमिर खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर खानने जर गौरी स्प्रॅटसह लग्न केले तर ते त्याचे तिसरे लग्न असणार आहे. आमिरने पहिल्यांदा रिना दत्तासह १९८६ साली लव्ह मॅरेज केले होते. १६ वर्षांनंतर आमिर आणि रिना दत्ता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २००२ साली ते विभक्त झाले. यानंतर आमिर खानने २००५ साली किरण रावसह लग्नगाठ बांधली होती. मात्र, आमिरचा दुसरा संसारही २०२१ साली तुटला. किरण राव आणि आमिर यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानचे नाव अनेक अभिनेत्रींसह जोडण्यात आले होते, मात्र नंतर तो गौरी स्प्रॅट हिला डेट करत असल्याचे समोर आले.