Aamir Khan shares anecdote: बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खान ओळखला जातो. आजवर त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यापैकी लगान हा एक सिनेमा आहे. हा सिनेमा प्रचंड गाजला.
आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या लगान सिनेमाबद्दल आजही बोलले जाते. या सिनेमात आमिर खान प्रमुख भूमिकेत होता. सिनेमाला त्या काळी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. आजही या लगान सिनेमाचा चाहतावर्ग मोठा आहे. या सिनेमात काम केलेले कलाकार शूटिंगदरम्यानच्या आठवणी सांगतात.
आता अभिनेता आमिर खानने एका मुलाखतीत या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. आमिर खानने नुकतीच जस्ट टू फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने खुलासा केला की सिनेमाच्या असिस्टंट डारेक्टर रीमा कागती त्याच्यावर ओरडल्या होत्या. त्याचे कारण म्हणजे तो वेळेवर शूटिंगसाठी पोहोचला नव्हता. आमिर खान हसत म्हणाला, “लगानमध्ये खूप कलाकार होते आणि रीमा कागती आमच्या दुसऱ्या असिस्टंट डायरेक्टर होत्या. त्या सगळ्या गोष्टींचे नियोजन करत असत. कोण कोणत्या वेळेत शूटिंगला येईल, कोणाला कधी नाश्ता मिळेल, अशा अनेक गोष्टींचे नियोजन त्या करत असत.”
“त्या माझ्यावर…”
पुढे तो म्हणाला, “नाश्त्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाई. मी हळूहळू खात असे. मी प्रत्येक गोष्ट हळू करत असे. तर मी त्यांना सांगितले की मला १५ मिनिट आधी बोलवत जा. त्यावर त्या माझ्यावर ओरडल्या. त्या म्हणाल्या की तुझ्यासाठी सगळी हेअर आणि मेकअप टीम १५ मिनिट लवकर येणार नाही. मी चित्रपटाचा निर्माता होतो आणि त्या मला ओरडत होत्या. मी म्हणालो की मला वेळ लागतो. त्या म्हणाल्या की ते मला माहित नाही. तुला त्याच वेळी यावे लागेल. त्या खूप रागाने बोलत होत्या, मला वाईट वाटले. मग मी त्यांना म्हणालो की मी आतापासून नाश्ता करणार नाही. माझ्या त्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्या म्हणाल्या की चांगली गोष्ट आहे. तू वेळेवर शूटिंगसाठी येशील. एक आठवडा मी नाश्ता केला नाही. पण, त्यानंतर मी पुन्हा नाश्ता करण्यासाठी जाऊ लागलो.”
याआधी अपूर्व लाखियाने फ्रायडे टॉकिजला दिलेल्या मुलाखतीत लगानच्या सेटवर वेळे पाळण्याचे किती महत्त्व होते, ते सांगितले होते.
तो म्हणालेला, “शूटिंगसाठी बस बरोबर वेळेत निघणार असल्याचे सांगितले होते. उशीर झालेल्यांसाठी फक्त तीन मिनिटांची मुभा होती. तिसऱ्या दिवशी आमिर उशिरा आला. रोनित रॉयकडे सुरक्षेची जबाबदारी होती. सगळे आले होते आणि आमिरची वाट पाहत होते, तसेच आता मी आमिरसाठी बस थांबवणार की त्याच्याशिवाय बस शूटिंगच्या ठिकाणी जाणार, अशीही त्यांच्या मनात उत्सुकता होती. मला थोडं घाबरल्यासारखं वाटत होतं. पण, सगळ्यांना वेळेत येण्याच महत्त्व समजलं पाहिजे, असं मला वाटलं. मी आमिर शिवाय जाण्याचा निर्णय घेतला आणि बस ड्रायव्हरला गाडी सुरू करण्यासाठी सांगितले. पण त्याने नकार दिला. रोनित दारात उभे राहून आमिरची वाट पाहत होता. मी त्याला लाथ मारली. तो बाहेर पडला. बसच्या ड्रायव्हरचा मी गळा पकडला आणि त्याला सांगितले की बस सुरू कर नाहीतर मी तुझी मान मान मोडेन.”
दरम्यान, अपूर्व लाखिया दिग्दर्शित मातृभूमी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
