अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी ५ जुलै रोजी मुंबईतील आमिरच्या घरी अतिशय साध्या आणि खासगी समारंभात लग्न केलं. या सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मि-मैत्रिणीच उपस्थित होते. लग्नानंतर आमिरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण त्याचा लूक असून यामध्ये तो अनवाणी असल्याचं दिसतं. लग्नानंतर आमिर खान पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आला असताना तो साध्या पांढऱ्या धोतर-कुर्त्यात पाहायला मिळाला. यावेळी तो अनवाणी होता आणि हात जोडून आभार मानताना दिसला. तसेच पाहुण्यांबरोबर काही फोटोही काढले.

आमिर खानने या साध्या आणि नम्र वागण्याने चाहत्यांची मनं जिंकली. इतका मोठा सोहळा असूनही त्याने संपूर्ण समारंभ अतिशय साधेपणाने साजरा केल्याबद्दल अनेकांनी त्याचं कौतुक केलं. या प्रसंगी आमिरने पांढऱ्या रंगाचा साधा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यावर ब्रोच लावून त्याने लूक पूर्ण केला होता. तर गौरी स्प्रॅटने नाजूक नक्षीकाम असलेला आकर्षक डिझायनर लेहेंग परिधान केला होता. हेअरस्टाईलमुळे त्यांचा सोज्वळ लूक अधिक खुलून दिसत होता.

आमिर खानच्या लूकची का होतेय चर्चा?

आमिर खानच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा होत असतानाच, त्याच्या लग्नातील लूकमधील आणखी एका खास गोष्टीने लक्ष वेधलं. आमिरने उजव्या पायात घातलेले जाड चांदीचे पैजण अनेकांचं लक्ष वेधून घेत होते. आमिरच्या या अनोख्या दागिन्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली. त्याच्या खासगी आणि साध्या लग्नसोहळ्यातील हे पैजण त्यांच्या संपूर्ण लूकमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

लग्नसोहळ्यापूर्वी आमिर खान यांनी हा विवाहसोहळा अतिशय छोट्या आणि खासगी स्वरूपात होणार असल्याचे सांगितले होते. तसेच चाहत्यांना आणि माध्यमांना नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्याचं आवाहनही केलं होतं. लग्नसोहळ्यातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये आमिर आणि गौरी स्प्रॅट कुटुंबीयांसोबत आनंदाने नृत्य करताना दिसत आहेत. इरफान पठाणने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आमिर आणि गौरी आपल्या जवळच्या नातेवाईकांबरोबर लग्नसोहळ्याचा आनंद लुटताना दिसतात. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये गौरी यांनी लग्नातील शपथ घेताना आमिरला तो त्यांचा रक्षक आणि आधार असल्याचं म्हटलं.

या खासगी विवाहसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. आमिर खानची मुलं जुनैद खान, आयरा खान आणि आझाद राव खान तसेंच गौरी स्प्रॅट यांचा मुलगाही या सोहळ्याला उपस्थित होता. त्यामुळे हा विवाहसोहळा अगदी कौटुंबिक वातावरणात पार पडला. सोहळ्यापूर्वी आयरा आणि जुनैद हे आमिर खानच्या मुंबईतील पाली हिल येथील निवासस्थानी पोहोचताना दिसले होते.

या सोहळ्याला आशुतोष गोवारीकर, ज्यांनी आमिरच्या ‘लगान’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय एली अवराम, वीर दास, माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण, रिया चक्रवर्ती आणि राज ठाकरे यांनीही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.