अभिनेता आमिर खानने त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी केलेल्या शारीरिक बदलांमुळे नेहमीच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘३ इडियट्स’मध्ये त्याने कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका सहज साकारली होती. ‘गजनी’साठी त्याने फिटनेसकडे लक्ष देत भूमिकेसाठी मेहनत घेतली होती, तर ‘दंगल’साठी त्याने दोनदा शरीरात मोठे बदल केले. आधी महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेसाठी भरपूर वजन वाढवलं आणि नंतर पुन्हा वजन कमी करून एका तगड्या पैलवानाचा लूक केला.

आता वयाच्या साठीनंतरही आमिरने पुन्हा एकदा शरीरात मोठा बदल केला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने १८ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला. याबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, वजन कमी करणं हा त्याचा मुख्य उद्देश नव्हता. तर शरीराची गरज समजून त्यानुसार डाएट प्लॅन केला ज्यामुळे त्याचा मायग्रेनचा त्रासही कमी झाल्याचं त्याने सांगितलं.

आमिर खानने असं घटवलं १८ किलो वजन

आमिर म्हणाला, “मी आरोग्यासाठी जो नवीन आहार सुरू केला आहे, त्याचा मला खूप फायदा झाला. मला वारंवार मायग्रेनचा त्रास होत होता. त्यामुळे आणखी एखादा फिटनेस प्लॅन करण्याऐवजी मी माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा निर्णय घेतला.” पुढे तो म्हणाला, “अँटी-इन्फ्लेमेटरी डाएटनुसार आहार घेत आहे. त्यामुळे माझं १८ किलो वजन कमी झालंच, पण मायग्रेनचाही त्रास खूप कमी झाला आहे.”

आमिर खानने त्याच्या रोजच्या आहाराबद्दल सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र, तो अँटी-इन्फ्लेमेटरी डायट फॉलो करत असल्याचं त्याने सांगितलं. तज्ज्ञांच्या मते, हा झटपट वजन कमी करणारा डाएट नाही. ‘हार्वर्ड हेल्थ’च्या माहितीनुसार, शरीरात इन्फ्लेमेशन राहिल्यास हृदयविकार, मधुमेह, संधिवात आणि इतर अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका वाढू शकतो. अँटी-इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये ताजे, नैसर्गिक आणि पौष्टिक अन्न खाण्यावर भर दिला जातो, तर जास्त प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ शक्यतो टाळले जातात. या प्रकारच्या आहारपद्धतीचं सर्वाधिक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मेडिटेरेनियन डाएट. अनेक वर्षांच्या संशोधनातून या आहाराचे आरोग्यासाठी फायदे असल्याचं समोर आलं आहे.

अँटी-इन्फ्लेमेटरी डाएट पाळणारे लोक सहसा साखरयुक्त पेयं, चॉकलेट आणि कँडी, पॅकेटबंद गोड पदार्थ, मैद्यापासून बनवलेला पांढरा ब्रेड आणि पास्ता, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खाणं टाळतात.