Arya Babbar On Abhishek Aishwarya Relationship: अभिनेता आर्य बब्बरने अनेक मोठ्या सिनेमांत, बॉलीवूडच्या मोठ्या निर्मात्यांबरोबर काम केले आहे. अगदी मनी रत्नम, फराह खान, विशाल भारद्वाज अशा मोठ्या निर्मात्यांबरोबर त्याने काम केले आहे. मात्र, त्याला फार यश मिळाले नाही.
अभिनेत्याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबद्दल बोलताना अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शकांबरोबर काम केले, तरीही यश मिळाले नाही, असे वक्तव्य केले. याबरोबरच, गुरू या सिनेमात काम करण्याचा त्याने अनुभव सांगितला. याबरोबरच, ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्याबद्दलही वक्तव्य केले.
आर्यने २००२ मध्ये अब के बरस या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तो तीस मार खान, मटरू की बिजली का मंडोला आणि गुरू या चित्रपटांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला होता.
चित्रपटांच्या अपयशाबद्दल आर्य बब्बरचे वक्तव्य
नुकतीच त्याने विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो चित्रपटांच्या अपयशाबद्दल म्हणाला, “चित्रपट यशस्वी होणे किंवा अयशस्वी होणे, हे अभिनेत्याच्या नियंत्रणात नसते. एखादा चित्रपट चालला नाही, तर तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. चित्रपट निर्मात्याची एक दूरदृष्टी असते आणि कधीकधी त्यावेळचे प्रेक्षक त्या दूरदृष्टीशी एकरूप होऊ शकत नाहीत. कधीकधी, प्रेक्षक अनेक वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाचे कौतुक करतात. मी फराह खानजींच्या ‘तीस मार खान’ सिनेमात काम केले आहे. जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो चालला नाही आणि आम्हाला त्या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. पण आज तो चित्रपट अनेक लोकांना खूप आवडतो.” आर्य असेही म्हणाला की मी ज्या चित्रपटांचा भाग होते, ते सिनेमे चुकीच्या वेळी प्रदर्शित झाले.
याच मुलाखतीत आर्यने मनी रत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या गुरू सिनेमाबद्दल वक्तव्य केले. या सिनेमात ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकांत होते.
“अभिषेक ज्या पद्धतीने ऐश्वर्याला…”
आर्य म्हणाला, “अभिषेकच्या कारकिर्दितील सर्वोत्तम सिनेमांपैकी एक गुरू हा एक सिनेमा आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव विलक्षण आहे.”
याच सिनेमादरम्यान, अभिषेक व ऐश्वर्यामध्ये अधिक जवळीक निर्माण झाली, असे म्हटले जाते. त्यावेळी अभिषेक ऐश्वर्याला कशी वागणूक देत असे, यावरही अभिनेत्याने वक्तव्य केले. तो म्हणाला, “अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाआधी, जेव्हा कदाचित ते एकमेकांच्या प्रेमात होते, रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अभिषेक ज्या पद्धतीने ऐश्वर्याला वागवत होता, तिचा आदर करत होता आणि तिच्यावर प्रेम करत होता, ते पाहणं खूप सुंदर होतं”, अशी आठवण आर्यने सांगितली.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे नाते गुरू सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अधिक घट्ट झाले. ऐश्वर्या व अभिषेक यांनी त्यापूर्वी ‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि ‘कुछ ना कहो’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अनेक वर्षांनंतर , अनेक वर्षांनंतर ‘उमराव जान’ आणि ‘गुरू’ या सिनेमांत काम केले. या दोन सिनेमांदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले, असे म्हटले जाते.
अभिषेक व ऐश्वर्या यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना आराध्या ही मुलगी आहे. सध्या ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. तर, अभिषेत बच्चन सध्या त्याच्या राजा शिवाजी सिनेमातील भूमिकेमुळे चर्चेत आहे. लवकरच तो किंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
