Aashiqui Actor Rahul Roy: ‘आशिकी’, ‘जुनून’ आणि ‘फिर तेरी कहानी याद आई’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांतून ९० च्या दशकात करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा मुख्य अभिनेता राहुल रॉय सध्या अत्यंत खडतर आर्थिक परिस्थिती आणि गंभीर आजाराशी लढा देत आहे. २०२० मध्ये आलेल्या भीषण ब्रेन स्ट्रोकनंतर काम मिळणे पूर्णपणे बंद झाल्याने घरचा खर्च चालवण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी लग्नसोहळ्यांमध्ये डान्स करावा लागत असल्याचे वेदनादायी सत्य ६० वर्षीय राहुलने उघड केले आहे. बॉलीवूडचा दबंग सलमान खानने उपचारांचा खर्च उचलल्याचे सांगत शून्यातून पुन्हा आयुष्य उभे करत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

राहुल व त्याच्या भावाचा एक खटला कोर्टात सुरू आहे. ३० लाख रुपयांचा हा वाद मिटवण्यासाठी दोघेही प्रयत्न करत आहेत. घटस्फोटाच्या वेळी सर्व मालमत्ता पत्नीच्या नावे केल्यानंतर आता राहुल शून्यातून आयुष्य उभं करतोय. “मी ६० वर्षांचा आहे आणि माझं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करतोय,” असं राहुल रॉय म्हणाला.

राहुल पुढे म्हणाला, “गेली ५ वर्षे मी आजारातून सावरतोय. त्यामुळे काम केलं नाही आणि खरं तर काम मिळतंही नव्हतंच. पण जर ब्रेन स्ट्रोक आला नसता तर मी बऱ्याच गोष्टी केल्या असत्या. आता मला थोडंफार काम मिळतंय, पण मला जास्त काम करायचंय. मला सेटवर कॅमेऱ्याचा सामना करून खूप आनंद झाला. माझ्या ३७ वर्षांच्या करिअरमध्ये मी चांगलं काम केलंय आणि आता पुढेही काम करण्यास उत्सुक आहे.”

मला पैशांची गरज आहे- राहुल रॉय

२०२० मध्ये आलेल्या ब्रेन स्ट्रोकनंतर काम मिळणं कठीण झालं असं राहुलने नमूद केलं. “मला खर्च भागवायला पैशांची गरज आहे. स्ट्रोकनंतर काम मिळणं अवघड झालं हंते. या ५ वर्षांत उदरनिर्वाहासाठी मी शक्य ते सगळं केलं. कधीकधी लग्नात डान्स करून मी २ लाख किंवा ४ लाख रुपये कमावतो. जे मला ट्रोल करतात, त्यांना हे माहीत नाही की हीसुद्धा मेहनतीची कमाई आहे. मलाही माझं पोट भरावं लागतं,” असं राहुल रॉय म्हणाला.

राहुल रॉयला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मदत केली. सलमान खान, करिश्मा कपूर, रवीना टंडन, फराह खान, अर्चना पुरण सिंग आणि पूजा भट्ट यांनी त्याला मदत केली. सलमान खानने त्याच्या उपचारांचा खर्चही उचलला होता. राहुल म्हणाला, “‘आशिकी’तील माझे सहकलाकार अनु अग्रवाल, दीपक तिजोरी, अवतार गिल आणि महेश भट्ट यांच्याशी मी संपर्कात आहे. दीपक चांगलं काम करतोय आणि लवकरच आम्ही एकत्र काम करू अशी आशा आहे.”

व्हिगन झालो, जैन आहार घेतो- राहुल रॉय

ब्रेन स्ट्रोकनंतर राहुलने त्याच्या जीवनशैलीत मोठा बदल केला. “स्ट्रोकनंतर मी पुन्हा चालू किंवा बोलू शकेन असंही वाटलं नव्हतं. मी खूप धुम्रपान करायचो आणि मांसाहारी होतो. पण आता मी पूर्णपणे व्हिगन झालो आहे. कांदा, लसूण, दूध सगळं सोडलंय. मी जैन आहार घेतो. दररोज नाश्त्यानंतर मला ८ गोळ्या घ्याव्या लागतात. पण आता माझी प्रकृती पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे,” असं राहुल रॉयने नमूद केलं.