बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि अभिनेता आयुष शर्मा यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१४ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी आयुषने अर्पिताशी लग्न केलं होतं, तेव्हापासून केवळ करिअरसाठी त्याने हे लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर होत असतो. आयुष त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलत नाही, पण या टीकेमुळे आधी वाईट वाटायचं, असा खुलासाही त्याने केला आहे. तसेच त्याने खान कुटुंबाबरोबर असलेल्या त्याच्या बाँडबद्दलही सांगितलं. सासरे सलीम खान यांना आजही ‘डॅड’ म्हणण्याची हिंमत होत नाही असं तो म्हणाला.

आयुष शर्मा सासरे सलीम खान यांना ‘डॅड’ म्हणू शकत नाही

आयुषने खुलासा केला की तो सलमान खानला सर्वजण ज्या नावाने हाक मारतात, त्याचप्रमाणे ‘भाई’ म्हणतो. मात्र सासरे सलीम खान यांना ‘पप्पा’ किंवा ‘डॅड’ म्हणण्याची हिम्मत त्याच्यात नाही. सासऱ्यांबद्दल आयुष शर्मा म्हणाला, “माझं त्यांच्याबरोबरचं नातं वेगळं आहे. माझी त्यांना डॅड म्हणायची हिंमत आजपर्यंत झालेली नाही. एक पटकथा लेखक म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे माझ्या मनातून त्यांच्यासाठी कायम ‘सलीम साहेब’ अशी हाक येते. ते महान आहेत. बऱ्याचदा असं होतं की मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि तितकंच आमच्यात बोलणं होतं. त्यांना डॅड किंवा पप्पा म्हणणं मला खूप विचित्र वाटतं. मी ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘जंजीर’ या चित्रपटांचा मोठा चाहता आहे. त्यामुळे त्यांच्याशी स्वतःहून बोलायची माझी हिंमतच होत नाही, त्यांच्यासमोर माझं डोकं नेहमी आदराने झुकलेलं असतं.”

करिअरसाठी अर्पिता खानशी लग्न करण्याच्या टीकेवर आयुष शर्मा म्हणाला…

“अर्पिताशी लग्न केल्यावर, मी करिअरसाठी तिच्याशी लग्न केल्याची टीका झाली. थेट माझ्या हेतूवर लोक कमेंट्स करायचे, त्यामुळे मला त्रास व्हायचा. पण गेल्या काही वर्षांत मला या गोष्टींचा फरक पडणं बंद झालंय. आमच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली असून आमचा मुलगा १० वर्षांचा आणि मुलगी ६ वर्षांची आहे. या ११ वर्षांत मी फक्त तीनच चित्रपट केले आणि त्यातील एकही हिट झाला नाही. त्यामुळे माझ्या करिअरचा आणि माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही,” असं स्पष्ट उत्तर आयुष शर्माने दिलं.

लोकांच्या ट्रोलिंगला उत्तर देऊन नात्याचा अनादर करायचा नसल्याचं आयुष शर्मा म्हणतो. “लोकांना जे दिसतं त्यावरून ते त्यांचं मत तयार करतात. आणि मग त्यावरून एक कथा रचतात. पण मी आता त्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. जर मी या ट्रोलिंगला उत्तर देऊ लागलो, तर तो माझ्या लग्नाचा अपमान असेल. कराण मला माझ्या नात्याचं स्पष्टीकरण कोणालाही देण्याची गरज नाही,” असं आयुश शर्माने स्पष्ट केलं.

आयुष शर्माचे चित्रपट

दरम्यान, आयुष शर्माच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आतापर्यंत फक्त तीन चित्रपट केले आहेत. त्याचा पहिला चित्रपट लव्हयात्री होता. २०१८ मध्ये आलेला हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यानंतर त्याने अंतिम: द फायनल ट्रुथ केला. सलमान खान असूनही आयुषचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. त्यानंतर त्याचा रुसलान चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. अशा रितीने त्याने केलेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले.