अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. तेव्हा आयुष अवघा २४ वर्षांचा होता आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठीच त्याने सलमान खानच्या बहिणीशी लग्न केलं, असा अनेकांचा समज झाला होता. आता त्यांच्या लग्नाला ११ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांना दोन मुलं आहेत, तरीही लोकांचा दृष्टिकोन बदललेला नाही. एका मुलाखतीत आयुषने त्याच्या लग्नावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया दिली.
माझ्या करिअरचा आणि कुटुंबाचा काहीही संबंध नाही – आयुष शर्मा
“सुरुवातीला अर्पिताशी लग्न करण्यामागच्या माझ्या हेतूवर लोकांनी केलेल्या कमेंट्समुळे मला त्रास व्हायचा. पण गेल्या काही वर्षांत मला या गोष्टींचा फरक पडणं बंद झालंय. आमच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आमचा मुलगा १० वर्षांचा आणि मुलगी ६ वर्षांची आहे. या ११ वर्षांत मी फक्त तीन चित्रपट केले आणि त्यातील एकही ब्लॉकबस्टर ठरला नाही. त्यामुळे माझ्या करिअरचा आणि माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही.”
आयुष पुढे म्हणाला, “लोकांना जे दिसतं त्यावरून ते त्यांचं मत बनवतात आणि मग त्यावरून एक कथा रचतात. पण मी आता या गोष्टींकडे लक्ष देत नाही. जर मी या टीकेला उत्तर देऊ लागलो, तर तो माझ्या लग्नाचा अनादर होईल. मला माझ्या नात्याचं स्पष्टीकरण कोणालाही देण्याची गरज नाही.”
या एका कारणामुळे अर्पिता मला घटस्फोट देऊ शकते – आयुष शर्मा
एका मीमची आठवण सांगत आयुष म्हणाला, “मी नुकताच अर्पिता आणि माझ्यावरील एक मीम पाहिला. त्यावर लिहिलं होतं- ‘प्लेस्टेशन मिळवण्यासाठी लोक काय काय करतात.’ चिडण्याऐवजी मला हसायला आलं. मला एक फोटो पोस्ट करून ‘माझ्याकडे प्लेस्टेशन प्रो आहे,’ असं सांगायचं होतं. पण नंतर मी तो विषय सोडून दिला. आपण लोकांचे तोंड बंद करू शकत नाही. ते फक्त मलाच ट्रोल करत नाहीत, तर प्रत्येकाबद्दल बोलतात.”
दुसऱ्या एका जोकचा उल्लेख करत आयुष म्हणाला, “कोणीतरी एकदा म्हटलं होतं की, माझे चित्रपट चालत नसल्यामुळे माझा आणि अर्पिताचा लवकरच घटस्फोट होईल. त्यावर मी उत्तर दिलं होतं. ते असं की ‘माझे चित्रपट चालले नाहीत म्हणून घटस्फोट होणार नाही, पण माझ्या वाईट जोकमुळे मात्र आमचा घटस्फोट नक्कीच होऊ शकतो!'”
मी अजूनही सलीम खान यांना ‘डॅड’ म्हणू शकत नाही – आयुष शर्मा
आयुषने सासरच्या लोकांबरोबरच्या त्याच्या संबंधांबद्दलही भाष्य केलं. तो सलमान खानला सर्वांप्रमाणेच ‘भाई’ म्हणतो, पण सलीम खान यांना ‘पप्पा’ किंवा ‘डॅड’ म्हणण्याची हिम्मत तो अजूनही करू शकलेला नाही. “माझं त्यांच्याबरोबरचं नातं वेगळं आहे. आजपर्यंत त्यांना डॅड म्हणण्याची हिंमत मी करू शकलेलो नाही. एक पटकथा लेखक म्हणून मी त्यांचा इतका आदर करतो की, माझं मन मला सांगतं की त्यांना फक्त ‘सलीम साहेब’ म्हण. ते एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. बरेचदा ते बोलतात आणि मी फक्त उत्तर देतो. त्यांना डॅड किंवा पप्पा म्हणणं मला खूप विचित्र वाटतं. मी ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘जंजीर’ या चित्रपटांचा मोठा चाहता आहे. त्यांच्यासमोर माझं डोकं नेहमी आदराने झुकलेलं असतं. मी कधीच त्यांच्याशी स्वतःहून बोलत नाही,” असं आयुष शर्माने सांगितलं.
अर्पिता खान कोण आहे?
अर्पिता खान ही प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे. तिचे संगोपन सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा अग्निहोत्री या भावंडांबरोबर झाले. अर्पिताचं लग्न अभिनेता आयुष शर्माशी झालंय. १८ नोव्हेंबर २०१४ रोजी हैदराबादच्या भव्य ‘फलकनुमा पॅलेस’मध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झालं. आयुष शर्मा माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचा नातू आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल व आयत ही दोन अपत्ये आहेत.
