‘मुंज्या’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता अभय वर्मा सध्या नेटफ्लिक्सच्या ‘ऑपरेशन सफेद सागर’ या सीरिजमधील फ्लाइंग ऑफिसर राजपाल सिंह धालीवाल या भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्याच्या कामाचं कौतुक होतं आहे पण, त्याचा अभिनयाचा प्रवास इथून सुरू झालेला नाही. त्याने हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ या चित्रपटातून ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभय वर्माने अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली. त्याने खुलासा केला की, विकास बहल यांच्या २०१९ मध्ये आलेल्या ‘सुपर ३०’ या चित्रपटात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करताना त्याला दररोज ८०० रुपये मानधन मिळायचं.

‘सुपर ३०’मध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून रोज ८०० रुपये मिळायचे

अभय वर्माने सांगितलं की, ‘सुपर ३०’ या चित्रपटातून त्याने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्याला दररोज ८०० रुपये मानधन मिळायचं. अभयने आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटलं, “मी सुपर ३० मध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. दररोज ८०० रुपये मिळायचे. दोन तास रांगेत उभं राहायचं, पैसे घ्यायचे आणि त्यानंतर ट्रेनने घरी जाण्यासाठी आणखी दोन तास लागायचे. घरी पोहोचेपर्यंत झोपायची वेळ व्हायची आणि डोळे मिटले की पुन्हा उठून शूटिंगला जाण्याची वेळ झालेली असायची.”

अभय वर्माने आणखी एक आठवण सांगितली. विकास बहल यांनी नकतंच त्याला अचानक मॅसेज करून भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर भेटायला जाण्यापूर्वी अभयने त्याच्या आईला सांगितलं की, ‘सुपर ३०’चे दिग्दर्शक विकास बहल यांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे. अभय वर्माने सांगितलं, “काही दिवसांपूर्वी विकास बहल मला भेटले. त्यांनी अचानक मला मॅसेज करून भेटायला बोलावलं. सर्वात आधी मी माझ्या आईला सांगितलं की, सुपर ३०चे दिग्दर्शक विकास बहल यांनी मला मॅसेज करून भेटायला बोलावलं आहे. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आम्ही जवळपास अर्धा तास बसून छान गप्पा मारल्या. मुंज्याबद्दल चर्चा झाली आणि भविष्यातील काही प्रोजेक्ट्सवरही आम्ही बोललो.”

या भेटीदरम्यान अभयने विकास बहल यांना आठवण करून दिली की, ‘सुपर ३०’च्या वेळी त्यांनी यापूर्वी एकत्र काम केलं आहे. त्याने विकास बहल यांना चित्रपटातील स्वतःची अवघ्या एका सेकंदाची छोटाशी व्हिडीओ क्लिपही दाखवली. अभयने सांगितलं, “त्यानंतर मी त्यांना एक फोटो दाखवला आणि म्हटलं, सर, तुम्ही माझे पहिले दिग्दर्शक आहात. ही आपली दुसरी भेट आहे. त्यावर ते म्हणाले, नाही रे, मी तुला पहिल्यांदाच भेटतोय. मग मी त्यांना सांगितलं, सर, मी सुपर ३०मध्ये ज्युनिअर आर्टिस्ट होतो. माझ्याकडे एक छोटीशी क्लिप आहे. त्यात एक गाणं आहे आणि मी फक्त एका सेकंदासाठी दिसतो. मी त्यांना ती क्लिप दाखवली आणि ते पाहिल्यानंतर विकास सर भावुक झाले.”

दरम्यान, नेटफ्लिक्सची ‘ऑपरेशन सफेद सागर’ सीरिज १९९९च्या कारगिल युद्धातील भारतीय वायुसेनेच्या भूमिकेवर आधारित आहे. यात त्याने कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या तरुण वैमानिकांपैकी एक फ्लाइंग ऑफिसर राजपाल सिंह धालीवाल ऊर्फ धाली यांची भूमिका साकारली आहे.