Abhijeet Bhattacharya Criticism On Lip Syncing: गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी छत्तीसगड राज्योत्सव २०२६ मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात लाइव्ह गाण्याच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“अनेकांच्या नजरेत तेच खलनायक…”

अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, “जर कोणी प्रत्यक्ष माईकसमोर लाइव्ह गात नसेल, तर त्याला परवानगी देऊ नका. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती. एका मंत्र्यांनी थेट स्टेजवर येऊन सत्य सांगितलं. ते म्हणाले होते तुम्ही गात नाही आहात. तुम्हाला नीट उभंही राहता येत नाही आणि तुम्ही प्रत्यक्ष लाइव्ह परफॉर्मन्सही करत नाही आहात. ते खरं बोललं, पण अनेकांच्या नजरेत तेच खलनायक ठरले. मात्र, अशा घटना प्रत्येक ठिकाणी स्टेजवर घडत असतात.”

अभिजीतने कोणत्याही गायकाचे किंवा मंत्र्याचे नाव घेतले नाही. मात्र, त्याचा रोख दलेर मेहंदी आणि उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांच्यात झालेल्या वादाकडे असल्याचे म्हटले जात आहे.

यावेळी अभिजीत यांनी आवाजाची स्थिती कशीही असली तरी नेहमी लाइव्ह गाणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “मी कसंही गायलो, माझा आवाज खराब झाला, घसा बसला, थकवा आला किंवा सूर चुकले तरी मी लाइव्हच गाणार; मी कोणत्याही परिस्थितीत लाइव्ह परफॉर्मन्स देईन.”

प्रेक्षकांनी तिकीट काढून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पैसे खर्च केलेले असतात, त्यामुळे त्यांच्याप्रती कलाकारांची जबाबदारी असते असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “तुम्ही तुमचा वेळ दिला, मेहनतीचे पैसे खर्च करून मला इथे बोलावलं आणि एवढी सगळी व्यवस्था केली. या कार्यक्रमामागे प्रशासन, संबंधित विभाग आणि तुम्हा सर्वांची मेहनत आहे. मी वचन देतो की मी तुमची अशा प्रकारे कधीही फसवणूक करणार नाही. गाण्याच्या नावाखाली केवळ ओठांची हालचाल करणार नाही. काही लोक असं करतात, पण मी असं करणार नाही,” असे अभिजीत भट्टाचार्य म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

लोकप्रिय गायक दलेर मेहंदी यांचा १८ ऑक्टोबरला उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे कुंजापुरी देवीच्या मेळ्यानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमादरम्यान भाजपा मंत्री सुबोध उनियाल यांनी स्टेजवर चढून, दलेर मेहंदी यांना दारू प्यायली आहे असे म्हणत रोखले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणानंतर मिका सिंगने सुबोध उनियाल यांनी माफी मागावी असे म्हटले होते. त्यानंतर मिकाच्या टीमने सुबोध उनियाल यांनी दलेर मेंहदी यांच्याशी फोनवर संवाद साधला, माफी मागितली, असे सांगितले होते.