Abhijeet Sawant and Priyanka Chopra : ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ या गाण्याचा उल्लेख जरी केला तरी डोळ्यासमोर अभिजीत सावंतचं नाव येतं. मराठमोळा गायक अभिजीत सावंत भारताचा पहिला ‘इंडियन आयडल’ ठरला होता. त्याची क्रेझ तेव्हा संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात होती. अगदी बॉलीवूडचे स्टार्स सुद्धा अभिजीतची क्रेझ पाहून थक्क झाले होते. याबद्दलचा किस्सा या गायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी अभिजीत एका कार्यक्रमात लाइव्ह परफॉर्मन्स सादर करण्यासाठी दिल्लीला गेला होता. यावेळी त्याची भेट प्रियांका चोप्राशी झाली. हा किस्सा अभिनेत्याने ‘रेडिओ नशा’ यांच्याशी संवाद साधताना सांगितला आहे.
अभिजीत म्हणाला, “आम्ही दिल्लीमध्ये एका ग्रँड कार्यक्रमासाठी गेलो होतो. तो शो खूप मोठा होता…सगळे स्टार्स तिथे आले होते. त्यावेळी मी नुकताच ‘इंडियन आयडल’ हा शो जिंकलो होतो. आता त्या शोची किती क्रेझ होती हे सर्वांनाच माहिती आहे. प्रियांका चोप्रा आणि अन्य बॉलीवूड कलाकार सुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते. पण, तेव्हा ‘इंडियन आयडल’मुळे सर्वांमध्ये माझी प्रचंड क्रेझ होती.”
अभिजीत पुढे म्हणाला, “मला अजूनही आठवतंय तो डिसेंबरचा महिना होता आणि दिल्लीमध्ये प्रचंड थंडी असते. दाट धुकं असल्याने अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली होती. आमचं फ्लाइट सुद्धा नियोजित वेळेपेक्षा फार उशिरा होतं. त्यामुळे एअरपोर्टवर या सगळ्या स्टार्सबरोबर मी एका खोलीत थांबलो होतो. आम्ही एकाच रूममध्ये बसून होतो कारण, आमची फ्लाइट जवळपास ३ ते ४ तास उशिरा होती. माझ्याबरोबर तेव्हा वेटिंग रूममध्ये राणी मुखर्जी, आफताब शिवदासानी, प्रियांका चोप्रा आणि अजून काही कलाकार होते. खरंतर या सगळ्यांना एवढ्या जवळून पाहायला मिळणं हे माझं नशीब होतं. ते लोक सुद्धा एकमेकांशी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत होते.”
“त्यावेळी अशाच गप्पागोष्टी सुरू असताना प्रियांका चोप्रा मला म्हणाली होती की, अरे… तू तर आमच्यापेक्षा फेमस आहेस कारण, तू गाणं गाताना लोक तुला मोठ्या प्रमाणात चिअर करत होते. एवढं चिअर तर आम्हाला सुद्धा केलं नाही. पण, मी तिला म्हटलं होतं असं काही नाहीये…मी या क्षेत्रात नवीन आहे आणि नुकताच हा शो संपलाय त्यामुळे लोक मला ओळखतात.” असं अभिजीतने यावेळी सांगितलं.
अभिजीतने सांगितला शाहरुख खानचा किस्सा…
“शाहरुख खानने या कार्यक्रमात माझ्याबद्दलचा किस्सा सांगितला होता. तो म्हणजे, त्याचं संपूर्ण कुटुंब ‘इंडियन आयडल’ हा शो पाहतं आणि त्याच्या बहिणीसह शाहरुखच्या कुटुंबातील सगळेच लोक माझे चाहते आहेत. मला खरंच ही प्रतिक्रिया ऐकून फार छान वाटलं होतं. त्या दिल्लीच्या शोमध्ये खान साहेब स्वत: उपस्थित होते. पण, ते शो संपल्यावर लगेच प्रायव्हेट जेटने घरी गेले होते. आम्ही बाकी सगळे कलाकार वेगळ्या फ्लाइटने एकत्र मुंबईत येणार होतो.”
