मराठमोळा गायक अभिजीत सावंत भारताचा पहिला इंडियन आयडॉल ठरला होता. हा शो जिंकल्यावर त्याने ‘आपका अभिजीत सावंत’ हा म्युझिक अल्बम लॉन्च केला होता. या अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अभिजीतचं ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं सर्वत्र तुफान गाजलं होतं. अगदी आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी अभिजीत एका कार्यक्रमात लाइव्ह परफॉर्मन्स सादर करण्यासाठी दिल्लीला गेला होता. यावेळी त्याची भेट प्रियांका चोप्राशी झाली. यावेळी ‘देसी गर्ल’ प्रियांका अभिजीतला नेमकं काय म्हणाली होती याबद्दलचा किस्सा त्याने अमोल परचुरेंच्या कॅचअप पॉडकास्टमध्ये सांगितला आहे.

…अन् प्रियांका चोप्रा म्हणाली

अभिजीत सावंत म्हणाला, “दिल्लीमध्ये एक शो होता…स्टार Night होती, अनेक बॉलीवूड स्टार्स त्या शोसाठी उपस्थित होते. प्रियांका चोप्रा, शाहरुख खान वगैरे…तर झालं असं की, खान साहेब शो संपल्यावर त्यांच्या वेगळ्या फ्लाइटने घरी गेले. पण मी, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी आणि अजून बरेच कलाकार होते आम्ही सगळे धुक्यामुळे एअरपोर्टवरच अडकलो. आम्ही एकाच रूममध्ये बसून होतो कारण, आमची फ्लाइट जवळपास ३ ते ४ तास उशिरा होती.”

“आता रूममध्ये बसून आम्हा सगळ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू होत्या. प्रियांका चोप्रा मला तेव्हा म्हणाली होती की, अरे… तू तर आमच्यापेक्षा फेमस आहेस कारण, तू गाणं गाताना लोक मोठ्या प्रमाणात चिअर करत होते. एवढं तर चिअर आम्हाला पण केलं नाही. पण, मी तिला म्हटलं होतं असं काही नाहीये.” असं अभिजीतने सांगितलं.

पुढे, इंडस्ट्रीविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, “आपल्या समाजाला अशी एक सवय आहे की, जो आपल्यापेक्षा जास्त पुढे जातो त्याला निगेटिव्हली बघायचं. अरे हा एवढा मोठा कसा झाला असा विचार आपण करू लागतो. वास्तव हे आहे की, आपण सगळे कौतुक सुद्धा अशाच लोकांचं करतो जे आपल्यापेक्षा मानाने कमी असतात. या सगळ्या प्रोसेसमधून पुढे जात स्वत:ला सिद्ध करणं हे माझ्यासाठी तेव्हा कठीण होतं.”

“माझ्या मते ‘Junoon’ हा नॉन-फिल्म म्युझिक इंडस्ट्रीचा शेवटचा अल्बम असावा. त्यानंतर काही मोजकेच असे म्युझिक अल्बम प्रदर्शित झाले असतील. नाहीतर, मधल्या काळात नॉन-फिल्म म्युझिक इंडस्ट्री पूर्णपणे कोसळली. या सगळ्याचा निश्चित फटका बसला. हळुहळू म्युझिक इंडस्ट्री बदलली पण कालांतराने युट्यूबमुळे या अल्बम गाण्यांना पुन्हा एकदा वाव मिळाला. सध्याच्या घडीला सगळ्या गोष्टी लोकांच्या हातात आहेत की त्यांना नेमकं कोणाला पुढे घेऊन जायचंय. त्यामुळे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत वगैरे या सगळ्याचा सुद्धा काम करताना फरक पडतो.” असं अभिजीतने सांगितलं.