इंडियन आयडॉल’चा १६वा सीझन नुकताच संपला. मात्र, गेल्या २० वर्षांहून अधिक काळ या शो पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गासाठी अभिजीत सावंत हे नाव आजही खास आहे. २००५ मध्ये अभिजीत या शोच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर अनेक विजेते झाले, मात्र अभिजीतला मिळालेली लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम आजही विसरता येणारं नाही.

त्याच वर्षी सोनीने ‘फेम गुरुकुल’ हा आणखी एक रिअॅलिटी शो सुरू केला होता. या शोमध्ये अरिजित सिंह आणि काझी तौकीर यांसारखे स्पर्धक होते. काझीने हा शो जिंकला होता आणि सध्या तो ‘बिग बॉस २०’मध्ये सहभागी आहे. तर अरिजित सिंह त्याच्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय पार्श्वगायकांपैकी एक आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतला अरिजितच्या तुलनेत त्याच्या कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल विचारण्यात आलं. यावर त्याने नशिबाच्या ताकदीबद्दल भाष्य केलं.

अरिजित १० वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहिला – अभिजीत

“२००५ नंतर अरिजित प्रसिद्धीपासून दूर राहिला. जवळपास १० वर्षे, हा काळ त्याच्यासाठी आशीर्वाद ठरला असं म्हणता येईल. तो म्युझिक स्टुडिओमध्ये जायचा आणि मोठ्या संगीतकारांबरोबर काम करायचा. गायक म्हणून नाही, तर निर्माता आणि प्रोग्रामर म्हणून,” असं तो म्हणाला. पुढे अभिजीत म्हणाला, “तो पुन्हा सुरुवात करण्यासाठी परतला आणि त्याने आपला प्रवास पुन्हा सुरू केला. त्यावेळी त्याला कोणीही ओळखत नव्हतं.”

मी अरिजीतपेक्षा खूप लोकप्रिय होतो – अभिजीत सावंत

अभिजीतने सांगितलं की, त्यावेळी तो अरिजितपेक्षा खूपच लोकप्रिय होता. “त्या काळात माझी आणि त्याची तुलना केली, तर मी अरिजीतपेक्षा खूप लोकप्रिय होतो. त्यामुळे माझ्यावर असलेला दबाव आणि त्याच्यावर असलेला दबाव खूप वेगळा होता. त्याने त्या १० वर्षांत खूप मेहनत घेतली. संगीतकारांबरोबर खूप काम केलं आणि त्यानंतर त्याला त्याचं पहिलं मोठं गाणं मिळालं,” असं अभिजीत म्हणाला.

‘तुम ही हो’ मिळणं नशिबाचा भाग होतं

अरिजितचं पहिलं गाणं ‘मर्डर २’मधील ‘दिल संभल जा जरा’ हे होतं. मात्र, ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्यामुळे तो लोकप्रिय झाला. अभिजीतने सांगितलं की, हे गाणं मिळणं हा केवळ नशिबाचा भाग होता. “तुम ही हो या गाण्याने अरिजितला अरिजित सिंह बनवलं आणि ते गाणं कोणत्याही गायकाच्या वाट्याला येणं… हे सगळं नशिबावर अवलंबून होतं,” असं अभिजीतने सांगितलं.

अभिजीतने पुढे सांगितलं की, प्रेक्षक सहसा कमी यशस्वी असलेल्या लोकांमध्ये उणिवा शोधतात आणि ज्यांना यश मिळालेलं दिसतं, त्यांचं कौतुक करत राहतात. मात्र, नेहमीच असं नसतं. “आपण यशस्वी व्यक्तीचं कौतुक करत राहतो, पण ज्यांच्याबद्दल आपल्याला फारसं माहीत नाही, त्यांच्यात आपण सतत उणिवा शोधत राहतो, ही प्रेक्षकांची एक चूक आहे. एवढंच नाही. प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास असतो. प्रत्येकजण काम करण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. त्यांना तसं करू द्या,” असं म्हणत त्याने आपलं म्हणणं मांडलं.