अभिषेक व ऐश्वर्या राय बच्चन या बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडीने नुकताच त्यांच्या लग्नाचा १९ वा वाढदिवस साजरा केला. हे दोघंही २० एप्रिल २००७ रोजी लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने अभिषेक आणि लेक आराध्यासह गोड फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय संपूर्ण मनोरंजन विश्वातून सुद्धा ऐश्वर्या व अभिषेकवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
जिनिलीया व रितेश देशमुख या दोघांनीही खास व्हिडीओ शेअर करत अभिषेक-ऐश्वर्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. २० एप्रिलला ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सुद्धा पार पडला. लग्नाचा वाढदिवस असूनही वेळात वेळ काढून अभिषेकने या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यासाठी रितेश-जिनिलीयाने त्याचे आभार मानले आहेत.
रितेश जिनिलीयाने या व्हिडीओमध्ये अभिषेक-ऐश्वर्याला ‘दादा-वहिनी’ म्हणत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.
जिनिलीया लिहिते, “अभिषेक व ऐश्वर्या बच्चन…तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! अभिषेक दादा.. तुमचं मी कायम कौतुक करत असते, तुम्हाला आदर्श मानते आणि मला तुमच्याकडून अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. काल ( २० एप्रिल ) तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता पण, तरीही तुम्ही फक्त आमच्यासाठी ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला आलात. सर्वात महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट म्हणजे ऐश्वर्या वहिनींनी देखील तुमच्या या निर्णयात तुमची साथ दिली. आयुष्यातील खास दिवस असूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आलात…यासाठी तुमचे खूप खूप आभार! मी तुम्हा दोघांची सदैव ऋणी राहीन. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा दादा-वहिनी!”
दरम्यान, अभिषेक बच्चन रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात संभाजीराजेंची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासह संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी आणि रितेश-जिनिलीया यांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
