बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यातील दुराव्याच्या बातम्या मागील खूप महिन्यांपासून येत होत्या. अशातच त्या दोघांचे एका लग्नातील फोटो समोर आले आहेत. त्यानंतर या अफवांना पूर्णविराम मिळाला. आता एका कार्यक्रमात रितेश देशमुखने अभिषेक बच्चनला दुसऱ्या बाळाबद्दल विचारलं. त्यावर त्याने काय प्रतिक्रिया दिली, ते जाणून घेऊयात.
अभिषेक बच्चनने नुकतीच रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता है’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये, रितेशने ‘ए’ अक्षरापासून सुरू होणारी नावं निवडण्याच्या बच्चन कुटुंबाच्या परंपरेचा उल्लेख केला. रितेश अभिषेकला म्हणाला, “अमिताभ जी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक.” या सर्वांची सुरुवात ‘अ’ अक्षराने होते. मग जया आंटी आणि श्वेता यांनी काय केलं होतं?…” यावर अभिषेक बच्चन म्हणाला, “हे त्यांना विचारावं लागेल. पण कदाचित ती आमच्या कुटुंबात एक परंपरा बनली आहे. अभिषेक, आराध्या…”
…अन् अभिषेक रितेशला म्हणाला, “वयाचा आदर कर”
अभिषेकला बोलताना अडवत रितेश म्हणाला, “आराध्यानंतर?” अभिषेक म्हणाला, “नाही, पुढची पिढी आल्यावर बघू.” रितेश गमतीत म्हणाला, “एवढी वाट कोण पाहणार? जसे रितेश, रियान, राहिल (त्याची दोन मुले). अभिषेक, आराध्या…” ऐश्वर्या रायबरोबर दुसऱ्या बाळाबद्दल ऐकून अभिषेक लाजला. मग तो म्हणाला, “वयाचा आदर कर, रितेश. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.” यानंतर रितेशने अभिषेकच्या पाया पडला आणि सगळेच हसू लागले.
हेही वाचा – “मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर या जोडप्याला २०११ मध्ये मुलगी झाली. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या आहे. आराध्या नुकतीच नोव्हेंबर महिन्यात १३ वर्षांची झाली. तिचा वाढदिवस ऐश्वर्या व आराध्याने दणक्यात साजरा केला होता. ऐश्वर्याने लेकीच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते.
अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो नुकताच ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटात झळकला होता. येत्या काळात तो ‘हाऊसफूल 5’ व शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे.