Abhishek Bachchan Aishwarya Rai Marriage Secrets: बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे बोलत असतो. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर त्याचे आयुष्य आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे, असं अभिषेक बच्चनने बरेचदा सांगितलंय. आता त्याने मुलीचा सांभाळ आणि पत्नी ऐश्वर्या रायबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलंय.

लिली सिंहशी बोलताना अभिषेक म्हणाला, “आराध्याला सतत प्रश्न विचारण्याची सवय आहे. तिच्या या सवयीमुळे मला अशा अनेक गोष्टींची जाणीव झाली, ज्यांचा मी यापूर्वी कधीही विचार केला नव्हता. आराध्याला मोठं होताना पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे.”

पत्नी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी असणं…

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. अभिषेकने त्याचा संसार, कुटुंब, नातं व लग्नाचे विविध पैलू याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. “आमच्या नात्याचा पाया नेहमीच पार्टनरशिपवर टिकून राहिला आहे. आमच्यात कधीही कामावरून स्पर्धा नसते किंवा जुन्या पद्धतीचे ‘स्त्री-पुरुष भेदभाव नसतात,” असं अभिषेक बच्चनने नमूद केलं. त्याने पुढे सांगितलं की, जेव्हा त्याचे वडील अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांचं लग्न झालं होतं, तेव्हा त्याची आई खूप मोठी स्टार होती. त्यामुळे पत्नी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी असणे, ही गोष्ट त्याच्यासाठी कधीच असामान्य नव्हती.

Award Banner

ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्याबद्दल अभिषेक बच्चन म्हणाला…

अभिषेकने सांगितलं की, तो ऐश्वर्याला त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासून ओळखतो आणि त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलंय. “आम्ही आधी मित्र होतो, मग आमचं नातं पुढे गेलं. आमची ओळख, साखरपुडा आणि लग्न हे सगळं एका पार्टनरशिपसारखं राहिलं. घर आणि कामाच्या बाबतीत आमच्यात कधीही ठराविक भूमिका वाटून दिलेल्या नव्हत्या,” असं तो म्हणाला.

abhishek-bachchan-aishwarya-rai-aaradhya-family
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या सुखी संसाराचे गुपित (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

मला पुरुषी किंवा श्रेष्ठ वाटावं म्हणून…

नात्यातील अहंकाराबद्दल अभिषेक बच्चनने भाष्य केलं. तो अहंकाराकडे नकारात्मक दृष्टीने पाहत नाही. त्याच्यामते, नात्यात पुढे जाण्यासाठी जोडीदाराने मागे हटण्याची गरज नसते. “मी यशस्वी व्हावं, म्हणून माझ्या पत्नीने थांबावं, अशी अपेक्षा ठेवणारा मी माणूस नाही. मला असं लग्न नकोय, जिथे माझ्या पत्नीला फक्त मला ‘पुरुषी’ किंवा श्रेष्ठ वाटावं म्हणून स्वतःच्या करिअरशी तडजोड करावी लागेल,” असं स्पष्ट मत अभिषेक बच्चनने मांडलं.

अभिषेक बच्चनने सांगितला आराध्याच्या बालपणीचा किस्सा

अभिषेक सांगतो की त्याचे आणि ऐश्वर्याचे विचार खूप जुळतात, त्यामुळेच त्यांचं नातं कोणत्याही दबावाशिवाय किंवा स्पर्धेशिवाय सहजपणे पुढे जातंय. अभिषेकने आराध्याच्या लहानपणीची एक रंजक आठवण सांगितली. “एकदा आम्ही टीव्ही पाहत होतो. मी आराध्याला विचारले, ‘आराध्या, तू तुझ्या बाबासाठी एक ग्लास पाणी आणू शकतेस का?’ तिने आधी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं, ‘का?’ मी म्हणालो, ‘कारण मी तुला म्हणतोय.’ शेवटी ती उठली, प्रेमाने पाणी घेऊन आली, मी तिचे आभार मानले आणि तिने मला किस केलं आणि मग गेली.”

अभिषेकने सांगितलं की त्यानंतर अर्ध्या तासाने एक किस्सा घडला. “काही वेळाने आराध्याने मला विचारलं, ‘बाबा, तुम्ही मला एक ग्लास पाणी आणाल का?’ मी सहज म्हणालो, ‘तू स्वतः जाऊन घे ना.’ त्यावर तिने मला असा प्रश्न विचारला ज्याचं माझ्याकडे उत्तर नव्हतं. ती म्हणाली, ‘का? जर तुम्ही मला पाणी आणायला सांगू शकता, तर मी तुम्हाला का नाही सांगू शकत?’ मला तिचं म्हणणं पटले. जर ती माझ्यासाठी पाणी आणू शकते, तर मी तिच्यासाठी का नाही? तेव्हापासून मी तिच्यावर कधीच हक्क किंवा अधिकार गाजवला नाही.”

पालकत्वाबद्दल अभिषेक बच्चनचे विचार

मुलीच्या संगोपनाबाबत अभिषेकने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. अभिषेक आणि ऐश्वर्या आराध्याला ‘काय बरोबर आणि काय चूक’ हे फक्त तोंडी सांगण्यापेक्षा स्वतः तसे वागून दाखवण्यावर भर देतात. ते तिच्यासाठी एक आदर्श उदाहरण बनण्याचा प्रयत्न करतात. ते तिच्या संगोपनात खूप कडक नियम किंवा ठराविक भूमिका पाळत नाहीत. त्यांच्या घरात असा कोणताही नियम नाही की पालकांपैकी एकानेच ठराविक गोष्टी शिकवायच्या. दोघेही मिळून तिला सगळ्या गोष्टी शिकवतात.