Paparazzi Talks About Abhishek Bachchan & Aishwarya Rai : अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. अलीकडेच स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये दोघांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. दोघांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेकदा वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात. परंतु, हे दोघे अनेकदा एकत्र उपस्थित रहात या चर्चांना पूर्णविराम देत असतात.
सेलिब्रिटी कपल कुठेही एकत्र जात असताना अनेकदा पापाराझी त्यांना स्पॉट करतात आणि त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. यावेळी काही सेलिब्रिटी त्यांना प्रत्युत्तर देतात, तर काही त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा काही पापाराझींशी फार संवाद न साधणं योग्य समजतात. अशातच आता हिंदी रशसह संवाद साधताना एका पापाराझीने अभिषेक बच्चन आणि इतर सेलिब्रिटींबद्दल सांगितलं आहे. त्यांनी यावेळी अभिषेक बच्चन एकटा असताना पापराझींशी फार संवाद साधत नाही आणि त्याला ऐश्वर्याला इतर कोणी ऐश म्हटलेलं आवडत नाही, असे म्हटले आहे.
पापाराझी काय म्हणाले
पापाराझी अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांना स्पॉट करतानाचा एक किस्सा सांगत म्हणाले, “अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय आणि त्यांची मुलगी आराध्या तिघेही पापाराझींना फोटो काढू देतात. अभिषेक बच्चन कधी कधी एकटा असल्यास फोटो काढायला नकार देतो, परंतु जेव्हा ते सर्व एकत्र असतात तेव्हा मात्र तो नाही म्हणत नाही. जेव्हा मी या क्षेत्रात नवीन होतो तेव्हा मी एकदा फोटो काढताना ऐश्वर्याला ऐश म्हटलं होतं, त्यावेळी अभिषेकने मला लूक दिला होता आणि त्यावरून मला समजलं की मी तिला या नावाने हाक नाही मारली पाहिजे.”
पापाराझीने पुढे बॉलीवूडमधील अजून एक लोकप्रिय कपल अनुष्का व विराट यांच्याबद्दलही सांगितलं आहे. या कपलबद्दल पापाराझी म्हणाले, “अनुष्का व विराट यांना त्यांच्या मुलांना कोणी क्लिक केलेलं आवडत नाही, त्यामुळे ते मुलांना गाडीत ठेवून बाहेर फोटोग्राफ देण्यासाठी येतात. दोघेही खूप चांगले आहेत.” पापाराझी यांनी पुढे बॉलीवूडमधील अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याबद्दलही सांगितलं आहे. तापसी पन्नू रूढ असून अनेकदा फोटोंसाठी नाही म्हणते, अशी तक्रारही यावेळी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पापाराझींनी काढलेले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. परंतु, यामुळे काही वेळा सेलिब्रिटींवर टीकासुद्धा होत असते, तर काही पापाराझी चुकीच्या अँगलने व्हिडीओ, फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात, अशी तक्रारही सेलिब्रिटी करत असतात.
