अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे हे फोटो न्यूयॉर्कमधले आहेत. ऑनलाईन फॅन पेजेसवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या कॅज्युअल कपड्यांमध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर एकत्र फिरताना दिसत आहेत. संध्याकाळी बाहेर पडताना दोघेही खूप रिलॅक्स दिसत होते. अभिषेकने स्ट्राइप्स असलेली टी-शर्ट, कॅप घातली होती. तर ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि केस मोकळे ठेवले होते.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एका चाहत्याबरोबर फुटपाथवर सेल्फी घेताना हसताना दिसत आहेत. अभिषेकच्या ‘किंग’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या बंद आहे, अशातच हे दोघे लाडक्या लेकीबरोबर सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर पडले आहे. अभिषेक अमेरिकेत सुट्ट्या घालवत असताना, दुसरीकडे ‘किंग’ चित्रपटाचा मुख्य अभिनेता शाहरुख खान त्याची पत्नी गौरी आणि मुलगी सुहानाबरोबर लंडनमध्ये सुट्ट्या घालवताना दिसला.

ऐश्वर्या रायचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. काही चाहते तिचे कौतुक करत आहेत, तर काहींच्या मते अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आता तेज दिसत नाही. एका युजरने “आता आपल्या क्वीनचं वय वाढत आहे,” असं लिहिलं तर दुसऱ्याने “पारोचा साधेपणा तसाच आहे, पण वाढलेलं वय दिसून येतंय,” अशी कमेंट केली आहे.

पाहा फोटो

abhishek-bachchan-aishwarya-rai-new-york-vacation-viral-photo
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन (फोटो – ऐश्वर्या राय फॅनपेज)

दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या बरेचदा सुट्ट्यांमध्ये न्यूयॉर्कला जातात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही ते न्यूयॉर्कलाच गेले होते. तिथे ते आराध्याबरोबर न्यूयॉर्कमध्ये फिरताना आणि एका सामान्य पर्यटकासारखा वेळ घालवताना दिसले होते. रेस्टॉरंटमध्ये खाण्यापिण्यापासून ते चाहत्यांसोबत फोटो काढण्यापर्यंत, त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान, अभिषेकने अलिकडेच ‘किंग’ चित्रपटाच्या टीमबरोबर केप टाउनमध्ये काही ॲक्शन सीन्सचे शूटिंग पूर्ण केले. तर तिथेच शाहरुख खानने दीपिका पादुकोणबरोबर काही रोमँटिक सीन्स आणि एका गाण्याचे शूटिंग केले. किंग चित्रपट ख्रिसमस २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी चर्चा आहे. पण निर्माते या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलू शकतात, कारण त्याची टक्कर ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’ आणि ‘ड्यून: पार्ट थ्री’शी होऊ शकते असंही म्हटलं जातंय.